एकमेव भारतीय जिम्नॅस्ट प्रणती नायक हिच्या पदरी निराशाच

सकाळ वृत्तसेवा
Monday, 26 July 2021

ऑलिंपिकमधील एकमेव भारतीय जिम्नॅस्ट प्रणती नायक हिच्या पदरी निराशाच आली. रविवारी झालेल्या कलात्मक (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टिक्समध्ये ती ऑल राऊंड फायनल्स गाठण्यास अपयशी ठरली.

टोकियो - ऑलिंपिकमधील एकमेव भारतीय जिम्नॅस्ट प्रणती नायक हिच्या पदरी निराशाच आली. रविवारी झालेल्या कलात्मक (आर्टिस्टिक) जिम्नॅस्टिक्समध्ये ती ऑल राऊंड फायनल्स गाठण्यास अपयशी ठरली.

पश्चिम बंगालमधील २६ वर्षीय प्रणती हिने फ्लोअर एक्साईज, व्हॉल्ट, अनइव्हन बार्स आणि बॅलन्स बीम या चार प्रकारात मिळून एकूण ४२.५६५ गुणांची नोंद केली. स्पर्धेतील उपविभाग २ नंतर सर्वसाधारण क्रमवारीत ती २९ व्या क्रमांकावर राहिली. या स्पर्धेत एकूण पाच उपविभाग आहेत. त्यात चारही प्रकारात मिळून सर्वोत्तम गुण नोंदविणारे पहिले २४ स्पर्धक सर्वांगिण अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. ही फेरी २९ जुलैला होईल. प्रत्येक प्रकारातील पहिले आठ जिम्नॅस्ट १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या वैयक्तिक प्रकारातील अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

प्रणतीची स्पर्धकांच्या क्रमवारीत दुसऱ्या टप्प्यात होती. तिने फ्लोअर प्रकारात १०.६३३ गुण, व्हॉल्टमध्ये १३.४६६ गुण, अनइव्हन बार्समध्ये ९.०३३ गुण, तर बॅलन्स बीममध्ये ९.४३३ गुण नोंदविले. 

खंडीय कोटा मिळाल्यामुळे प्रणती नाईक ऐनवेळी ऑलिंपिक स्पर्धेस पात्र ठरली होती, त्यामुळे तिला टोकियोतील स्पर्धेसाठी तयारी करण्यास पुरेसा वेळ मिळाला नव्हता. कोविड-१९ महामारीमुळे चीनमध्ये २९ मे ते १ जून या कालावधीत नियोजित असलेली नववी आशियाई सीनियर अजिंक्यपद स्पर्धा रद्द झाल्यानंतर खंडीय कोट्यानुसार खेळाडूंची ऑलिंपिकसाठी निवड झाली होती. २०१९ मधील आशियाई कलात्मक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रणतीने व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक जिंकले होते.


​ ​

संबंधित बातम्या