टोकियोतील कालावधी वाढणार असल्याने वाढती अनिश्चितता

पीटीआय
Thursday, 6 May 2021

कोरोनाची लाट रोखण्यासाठी टोकियो तसेच जपानच्या अन्य प्रमुख प्रांतामधील आणीबाणीत वाढ करण्याचा विचार जपान सरकार करीत आहे, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे.

टोकियो - कोरोनाची लाट रोखण्यासाठी टोकियो तसेच जपानच्या अन्य प्रमुख प्रांतामधील आणीबाणीत वाढ करण्याचा विचार जपान सरकार करीत आहे, त्यामुळे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेबाबत पुन्हा एकदा अनिश्चितता निर्माण झाली आहे. 

ऑलिंपिक होणाऱ्या टोकियोबरोबरच ओसाका, क्योतो, ह्योगो या प्रांतात ११ मेपर्यंत आणीबाणी आहे. यात वाढ करण्याचा विचार असल्याचे संकेत जपान सरकार देत आहे. ही आणीबाणी २५ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. त्यात वाढ झाल्यास ऑलिंपिक नव्याने निश्चित केलेल्या तारखेस म्हणजेच २३ जुलैस सुरू होणार काही शंका घेतली जात आहे. गतवर्षी होणारे ऑलिंपिक यापूर्वीच एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले आहे. 

आणीबाणीचा क्रीडा स्पर्धांवर परिणाम झालेला नाही. जपानच्या उत्तर किनाऱ्यावर असलेल्या सापोरा येथे अर्धमॅरेथॉन चाचणी घेण्यात आली. मात्र आणीबाणी लागू झाल्यास कदाचित यावेळी निर्बंध कठोर असतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणीबाणी किती दिवसांनी वाढवणार याबाबत जपान सरकारमधील मंत्र्यांनी सध्या मौन बाळगले आहे, पण ओसाकातील अधिकाऱ्यांनी यात तीन ते चार आठवडे वाढ होऊ शकेल हे संकेत दिले आहेत. पंतप्रधान कार्यालयाने याबाबत काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. 

सध्याच्या परिस्थितीत टोकियोतील रेस्टॉरंट, बार, कराओके पार्लर बंद आहेत. त्याचबरोबर डिपार्टमेंट स्टोअर्स तसेच सिनेमागृहांना टाळे आहे. मात्र प्रमुख क्रीडा स्पर्धा प्रेक्षकांविना सुरू आहेत.


​ ​

संबंधित बातम्या