नॉर्वेच्या वॉरहॉमचे विश्वविक्रमासह सुवर्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 August 2021

नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहॉम याने स्वतःचाच विश्वविक्रम ०.७६ सेकंद फरकाने मागे टाकत ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. मंगळवारी त्याने ४५.९४ सेकंद वेळेसह अव्वल क्रमांक पटकावला.

टोकियो - नॉर्वेच्या कार्स्टन वॉरहॉम याने स्वतःचाच विश्वविक्रम ०.७६ सेकंद फरकाने मागे टाकत ऑलिंपिकमध्ये ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत नव्या विश्वविक्रमासह सुवर्णपदक जिंकले. मंगळवारी त्याने ४५.९४ सेकंद वेळेसह अव्वल क्रमांक पटकावला.

अमेरिकेच्या रे बेंजामिन याने रौप्यपदक जिंकताना ४६.१७ सेकंद वेळ नोंदवली. या प्रयत्नात त्याने वॉरहॉम याने गतमहिन्यात नोंदवलेली ४६.७ सेकंदाची वेळ मोडीत काढली. ब्राझीलच्या अॅलिसन दोस सांतोस याला ४६.७२ सेकंद वेळेसह ब्राँझपदक मिळविले. या शर्यतीत आठपैकी सहा जणांनी विश्वविक्रम, आंतरखंडीय विक्रम अथवा राष्ट्रीय विक्रम नोंदविण्याची किमया साधली. साहजिक शर्यत बहुतेक धावपटूसाठी संस्मरणीय ठरली.

सुवर्णपदकानंतर वॉरहॉम याने जबरदस्त जल्लोष केला. अंतिम रेषा पार केल्यानंतर त्याने आनंदाने अंगावरील जर्सी फाडली. २०१७ मध्ये त्याने जागतिक स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. त्यावेळेप्रमाणेच तोंड उघडून आश्चर्यचकित होण्याच्या शैलीत आनंदोत्सव साजरा केला. 

पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्याच्या शर्यतीबाबत खूप उत्सुकता होती. जूनमध्ये अमेरिकेच्या ऑलिंपिक चाचणीत बेंजामिन याने ४७ सेकंदाच्या आत अंतर पूर्ण करणारा अवघा चौथा पुरुष हा मान मिळवला होता. त्या वेळी त्याने ४६.८३ सेकंद वेळेची नोंद केली होती. त्यानंतर काही आठवड्यांत वॉरहॉम याने ४६.७० वेळ नोंदवून आव्हान दिले होते. 

विंडीज क्रिकेटपटूच्या मुलाला रौप्यपदक
वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा राय बेंजामिन ऑलिंपिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करीत असून चारशे मीटर हर्डल्स शर्यतीत त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. नवीन अमेरिकन विक्रम नोंदविताना त्याने ४६.१७ सेकंद वेळ दिली.


​ ​

संबंधित बातम्या