माजी राष्ट्रीय टेटे विजेते चंद्रशेखर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 13 May 2021

भारतीय टेबल टेनिस संघाचे माजी मार्गदर्शक तसेच अर्जुन पुरस्कार विजेते व्ही. चंद्रशेखर (वय ६३) यांच चेन्नईत कोरोनामुळे निधन झाले. तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद जिंकलेले चंद्रशेखर हे कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी या परीक्षेत सुवर्णपदक जिंकले होते.

मुंबई - भारतीय टेबल टेनिस संघाचे माजी मार्गदर्शक तसेच अर्जुन पुरस्कार विजेते व्ही. चंद्रशेखर (वय ६३) यांच चेन्नईत कोरोनामुळे निधन झाले. तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद जिंकलेले चंद्रशेखर हे कायद्याचे पदवीधर होते. त्यांनी या परीक्षेत सुवर्णपदक जिंकले होते.

पायावरील चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे चंद्रा यांच्या कारकिर्दीवर परिणाम झाला. ते १९८३ मध्ये अखेरची राष्ट्रीय स्पर्धा खेळले होते. त्यात कमलेश मेहता यांच्याविरुद्ध पराजित झाले. मेहता यांचे ते नऊ राष्ट्रीय विजेतेपदांपैकी पहिले विजेतेपद होते. तमिळनाडूच्या अनेक राष्ट्रीय विजेतेपदात चंद्रा यांचा मोलाचा वाटा होता. त्यांची १९८४ मध्ये मनजित दुआ यांच्याविरुद्ध मध्य विभागीय स्पर्धेत अंतिम लढत झाली. त्या वेळी चाहत्यांनी त्यांची हुर्यो उडवली होती. त्या वेळी ते केवळ २५ वर्षांचे होते, तरीही त्यांनी कडवी लढत दिली होती. 

इस्लामाबादमधील आशियाई स्पर्धेसाठी चंद्रा यांची निवड झाली. त्या वेळी त्यांच्यासह भारतीय संघात कमलेश, सुजय घोरपडे, अरुण ज्योती बारुआ होते. या स्पर्धेत खेळण्याऐवजी चंद्रा यांनी दुखऱ्या पायावर शस्त्रक्रिया करण्याचे ठरवले; पण चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांची दृष्टी अधू झाली. वाचा जवळपास गेली; तसेच त्यांना स्वतःहून काही करणे अशक्य झाले. त्यातून बरे झाल्यावर चंद्रा यांनी खेळाडूंच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी एम. एस. मैथिली, जी. साथीयन यांच्यासारखे चांगले खेळाडू घडवले. दरम्यान, त्यांनी रुग्णालयाविरुद्धची दीर्घकाळ चाललेली कायदेशीर लढाई जिंकली. 

चंद्रशेखर चांगले मित्र होते. तसेच मार्गदर्शक. त्यांनी भारतात टॉप स्पिन लोकप्रिय केला. जपानमधील प्रशिक्षण शिबिरात त्यांनी हे कौशल्य आत्मसात केले. त्यांच्यासारखा खेळाडू, सहकारी, मित्र मिळणे विरळाच असते.
- कमलेश मेहता


​ ​

संबंधित बातम्या