ऑलिंपिक सुवर्णविजेतींना पाच गाई तसेच घराची भेट

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 August 2021

पाच गाई, मीटबॉल रेस्टॉरंट आणि नवे घर. ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या इंडोनेशियाच्या ग्रेसिया पॉलिल आणि आप्रियाना राहायू यांच्यासाठी झालेली ही केवळ काही बक्षिसे आहेत.

जकार्ता - पाच गाई, मीटबॉल रेस्टॉरंट आणि नवे घर. ऑलिंपिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या इंडोनेशियाच्या ग्रेसिया पॉलिल आणि आप्रियाना राहायू यांच्यासाठी झालेली ही केवळ काही बक्षिसे आहेत.

इंडोनेशियावासीय बॅडमिंटन प्रेमी आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धा घेण्याची त्यांची कायम तयारी असते. त्यांनी १९९२ पासून प्रत्येक स्पर्धांमध्ये किमान एक सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेत ग्रेसिया आणि आप्रियाना यांनी महिला दुहेरीत बाजी मारली. त्यांनी चीनच्या चेन क्विंग चेन - जिआ यि फान यांना हरवून इंडोनेशियाचे ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक जिंकले.

कोरोना महामारीमुळे इंडोनेशियातील बॅडमिंटन खेळणाऱ्यांच्यात घट झाली आहे. आता या दोघींच्या यशामुळे पुन्हा बॅडमिंटन लोकप्रिय व्हावे हा इंडोनेशियाच्या सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्यांनी ५ अब्ज इंडोनेशियन रुपयांचे (३ लाख ४९ हजार डॉलर) बक्षीस सुवर्ण विजेत्या जोडीस जाहीर केले.

आप्रियानी हिचे घर सुलावेसी बेटावर आहे. तेथील प्रमुखांनी पाच गाई तसेच घर भेट देण्याची घोषणा केली. मीटबॉल रेस्टॉरंटची चेन असलेल्या समूहाने थेट एक रेस्टॉरंटच भेट दिले. आप्रियानी आणि ग्रेसिया यांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. अंतिम लढतीदरम्यान ग्रेसियाने रॅकेट बदलली आणि तिचा खेळ उंचावला. त्याच्यावर समाज माध्यमांवर मीम्स तयार झाले. त्याला ३८ हजार लाईक्स लाभले आहेत.

महिला बॅडमिंटनमधील सुवर्णपदकामुळे देशातील जास्तीत जास्त महिला खेळात कारकीर्द करण्याचा विचार करतील अशी आशा बाळगली जात आहे. नव्या बॅडमिंटनपटूंची नोंदणी जवळपास थांबली असताना त्यांनी जिंकलेले विजेतेपद परिस्थिती बदलेल अशी आशा बाळगली जात आहे. १३ वर्षांची असल्यापासून ऑलिंपिक सुवर्णपदकाचे स्वप्न पाहिले होते, ते आता पूर्ण झाले, ही ३३ वर्षीय ग्रेसियाची टिप्पणी प्रत्येक खेळाडूस सर्वोत्तम खेळासाठी प्रेरणा देईल, अशी अपेक्षा बाळगली जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या