ऑलिंपिक पात्र राही सरनोबतसह पाच खेळाडू लसीकरणाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 June 2021

आघाडीची नेमबाज राही सरनोबतसह ऑलिंपिक पात्र पाच खेळाडूंचे लसीकरण झाले नसल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने जाहीर केले.

नवी दिल्ली - आघाडीची नेमबाज राही सरनोबतसह ऑलिंपिक पात्र पाच खेळाडूंचे लसीकरण झाले नसल्याचे भारतीय ऑलिंपिक संघटनेने जाहीर केले. 

ऑलिंपिक खेळण्याची शक्यता असलेल्या १२० क्रीडापटूंनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, त्यापैकी ५८ जणांनी दोन्ही मात्रा घेतल्या आहेत. याशिवाय ११४ मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफनी पहिली मात्रा घेतली आहे, तर ३७ जणांच्या दोन्ही मात्रा झाल्या आहेत. 

दरम्यान, राहीसह नेमबाज सौरभ चौधरी, दीपक कुमार, मेईराज अहमद खान तसेच बॉक्सर सिमरनजीत यांनी पहिली मात्राही घेतलेली नाही, असे सांगण्यात आले. ऑलिंपिकला जाणाऱ्या प्रत्येकाने लसीकरण पूर्ण करावे, अशी सूचना भारतीय ऑलिंपिक संघटनेने केली आहे. 

चारही नेमबाजांचे लसीकरण येत्या आठवड्यात होईल. त्यासाठीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. आम्ही त्यासाठी भारतीय नेमबाजी संघाच्या संपर्कात आहोत. 
- राजीव भाटिया, भारतीय नेमबाजी संघटनेचे सचिव


​ ​

संबंधित बातम्या