टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडूंना निरोप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 August 2021

ऑलिंपिक स्पर्धेतील यशानंतर आता लक्ष लागून राहिलेल्या टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेसाठी ५४ भारतीय खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाकडून निरोप देण्यात आला. हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून परततील, असा विश्वासही या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

नवी दिल्ली - ऑलिंपिक स्पर्धेतील यशानंतर आता लक्ष लागून राहिलेल्या टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेसाठी ५४ भारतीय खेळाडूंना क्रीडा मंत्रालयाकडून निरोप देण्यात आला. हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करून परततील, असा विश्वासही या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

नऊ खेळांच्या प्रकारात ५४ खेळाडू सहभागी होत आहेत. यात देवेंद्र झाझारिया (२००४ आणि २०१४ सुवर्णपदक), मरियप्पन थांगावेलू (उंच उडी) आणि जागतिक विजेता संदीप चौधरी (भालाफेक) यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

गतवेळेस रियोत झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत मरियप्पने सुवर्णपदक जिंकले होते. तो यंदा भारतीय पथकाचा ध्वजधारक असणार आहे. ही पॅरालिंपिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत होत आहे.

राष्ट्रीय पुरस्कार लांबणीवर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडणार आहे. टोकियोत पॅरालिंपिक स्पर्धा सुरू होत आहे, त्यात भारतीय चांगली कामगिरी करण्याची शक्यता आहे आणि त्यांचाही सन्मान व्हावा म्हणून क्रीडा मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

पॅरालिंपिक स्पर्धा २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत टोकियोत होत आहे. पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्याकरिता क्रीडा खात्याने जुलै महिन्यात समितीही नियुक्त केली आहे, परंतु ऑलिंपिकसह पॅरालिंपिक पदकविजेत्या खेळाडूंच्या निवडीसाठी हा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याची मागणी या समितीने केली होती.

ऑलिंपिकप्रमाणे पॅरालिंपिक स्पर्धेत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंकडून पदकविजेती कामगिरी अपेक्षित आहे, असे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. पुरस्कार निवडीसाठी तयार करण्यात आलेल्या समितीचे काम अजून सुरू झाले नसल्याचीही माहिती ठाकूर यांनी दिली.


​ ​

संबंधित बातम्या