नेमबाजांच्या अपयशाबद्दल प्रत्येकाचा सखोल आढावा होईल; अध्यक्षांची स्पष्टोक्ती

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीचे नक्कीच सखोल विश्लेषण होईल. त्याच वेळी माझ्यापासून मार्गदर्शकांपर्यंतच्या प्रत्येकाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येईल. कोणीही यास अपवाद नसेल, असे भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले.

मुंबई - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील भारतीय नेमबाजांच्या कामगिरीचे नक्कीच सखोल विश्लेषण होईल. त्याच वेळी माझ्यापासून मार्गदर्शकांपर्यंतच्या प्रत्येकाच्या कामगिरीचा आढावा घेण्यात येईल. कोणीही यास अपवाद नसेल, असे भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष रनिंदर सिंग यांनी सांगितले.

मिश्र दुहेरीतील अपयशानंतर रनिंदर यांनी टोकियोत काही निवडक माध्यमांच्या प्रतिनिधींसह संवाद साधला. त्या वेळी त्यांनी आम्ही सर्वच मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचे विश्लेषण करणार आहोत. कदाचित यात आमूलाग्र बदल होऊ शकेल. आता कोणीही आम्हाला वेठीस धरू शकणार नाही. ते दिवस कधीच सरले आहेत, असे रनिंदर सिंग म्हणाले.

केवळ पिस्तूल किंवा केवळ रायफल मार्गदर्शकांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार नाही. केवळ खेळाडूंच्याच अपयशाबाबत का चौकशी करायची. सर्वंकष आढावा घ्यायला हवा. त्यास मीही कसा अपवाद असेन. अर्थात मी जेवढे शक्य होते, ते सर्व केले आहे. त्यामुळे यास मी कमी जबाबदार आहे, असे मला वाटत आहे; पण हा माझा संघ आहे. त्याच्या यशापयशास मीही जबाबदार आहे, असे ते म्हणाले. 

नेमबाजांनीही प्रयत्नांची शर्थ केली. ऑलिंपिकला कोणी हरण्यासाठी जात नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खेळाडूच नव्हे तर मार्गदर्शक, सपोर्ट स्टाफच्या कामगिरीचा सखोल आढावा घेणार आहोत. भारतीय नेमबाजी संघटनेस आता कोणीतरी वेठीस धरण्याचे दिवस कधीच संपले आहेत. आता आढावा घेताना माझ्यासह कोणीही अपवाद नसेल.
- रनिंदर सिंग, भारतीय नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष


​ ​

संबंधित बातम्या