ऑलिंपिकमध्ये खेळणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे लसीकरण

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 May 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे लसीकरण झाले असेल अशी ग्वाही भारतीय ऑलिंपिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीस दिली आहे.

नवी दिल्ली - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक भारतीयाचे लसीकरण झाले असेल अशी ग्वाही भारतीय ऑलिंपिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीस दिली आहे. 

ऑलिंपिक स्पर्धेसाठी येणारा प्रत्येक भारतीय सर्व सूचनांचे कठोरपणे पालन करेल. या स्पर्धेसाठी असलेल्या आचारसंहितेचे पूर्णपणे पालन भारतीय करतील, अशी ग्वाही भारतीय ऑलिंपिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती तसेच स्पर्धा संयोजन समितीस दिली आहे, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले. स्पर्धेसाठी भारतातून येणाऱ्या खेळाडू, पदाधिकारी, तांत्रिक अधिकारी तसेच सदस्यांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे, असेही बत्रा यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीस लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. 

भारतीय ऑलिंपिक संघटनेने यापूर्वीच टोकियोला पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या संघटनांना प्रवासाचा कार्यक्रम, तसेच जपानमधील मुक्कामासंदर्भात माहिती देण्यास सांगितले आहे. दरम्यान, ऑलिंपिकला जाणाऱ्या प्रत्येक भारतीयांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार साह्य करीत आहे, त्याबद्दल संघटनेने केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.


​ ​

संबंधित बातम्या