टोकियोत सुरू असलेल्या आणीबाणीत २० जूनपर्यंत वाढ होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Friday, 28 May 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दोन महिन्यांवर असताना कोरोना रोखण्यासाठी टोकियोत सुरू असलेल्या आणीबाणीत २० जूनपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. हे घडल्यास ऑलिंपिक एक महिन्यावर असेपर्यंत ही आणीबाणी असेल.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा दोन महिन्यांवर असताना कोरोना रोखण्यासाठी टोकियोत सुरू असलेल्या आणीबाणीत २० जूनपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. हे घडल्यास ऑलिंपिक एक महिन्यावर असेपर्यंत ही आणीबाणी असेल.

ऑलिंपिकचे संयोजन करायचे असेल, तर टोकियोतील रोजचे रुग्ण शंभरपेक्षा कमी होण्याची गरज आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा प्रेक्षकांविना घेणेच योग्य ठरेल. जुलै - ऑगस्टमध्ये नवी लाट येण्याची शक्यता आहे. या परिस्थितीत संयोजन धोक्याचे ठरेल, असा इशारा वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी देत आहेत. त्यामुळे जपान शुक्रवारी आणीबाणी वाढवण्याचा निर्णय घेईल, अशी चिन्हे आहेत. 

ऑलिंपिक होणाऱ्या टोकियो प्रशासनासह ओसाका तसेच अन्य राज्यांनी आणीबाणी किमान २० जूनपर्यंत अमलात आणण्याची आग्रही सूचना केली आहे. 

रुग्णवाढ कमी झाली आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे, पण निर्बंध उठवल्यास कोरोना बाधित रुग्णांत वेगाने वाढ होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीस सामोरे जाणे अवघड होईल, असे ओसाका प्रशासनाने कळवले आहे.
जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा शुक्रवारी वैद्यकीय तज्ज्ञांसह चर्चा करणार आहेत. यापूर्वीच जपानमधील काही प्रांतातील आणीबाणी २० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

अधिकाऱ्यांतच मतभेद
संयोजन समितीच्या सीईओ तोशिरो मुतो यांनी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी नऊ रुग्णालये राखीव ठेवली आहेत, असे सांगितले, पण जुलै ऑगस्टमध्ये जपानमध्ये वाढत्या उष्णतेमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या व्यक्तींत वाढ होत असते. या परिस्थितीत ऑलिंपिकसाठी रुग्णालये राखून ठेवल्यास यंत्रणेवर जास्त ताण पडेल, अशी भीती युनियन चेअरमनन नाओतो उएयामा यांनी व्यक्त केली.


​ ​

संबंधित बातम्या