टोकियोतील आणीबाणी रद्द; ऑलिंपिक स्पर्धा होण्याचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 18 June 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनाची सुचिन्हे दाखवत जपानने टोकियोतील आणीबाणी उठवण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी प्रेक्षक संख्या स्पर्धा कालावधीत मर्यादित राहील याचे संकेत देत कठोर निर्बंध कायम ठेवले आहेत.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनाची सुचिन्हे दाखवत जपानने टोकियोतील आणीबाणी उठवण्याचा निर्णय घेतला, पण त्याचवेळी प्रेक्षक संख्या स्पर्धा कालावधीत मर्यादित राहील याचे संकेत देत कठोर निर्बंध कायम ठेवले आहेत. 

कोरोनाची साथ रोखण्यासाठी एप्रिलपासून टोकियोत आणीबाणी लागू करण्यात आली होती. ती आता ऑलिंपिक सुमारे एक महिना दूर असताना उठवण्याचा निर्णय झाला आहे. जपानमधील परिस्थितीत मेच्या मध्यापासून सुधारणा होत आहे. रुग्णालयात बेडसही आता उपलब्ध आहेत, असे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी सांगितले. 

दरम्यान, सध्याच्या परिस्थितीत स्टेडियमवर ५० टक्के चाहत्यांना प्रवेश देण्याची तरतूद होती, पण आता निर्बंध नसलेल्या क्षेत्रातील स्टेडियममध्ये दहा हजार चाहत्यांना प्रवेश देता येईल. अर्थात प्रेक्षकांच्या उपस्थितीबाबत अंतिम निर्णय काही दिवसांतच होईल. जपानच्या विविध प्रांतातील वरिष्ठ आरोग्य अधिकारी प्रेक्षकांविनाच स्पर्धा घेण्यासाठी आग्रही आहेत. 

जपानमधील कोरोनाबाधितांची संख्या अन्य देशांच्या तुलनेत कमी असली तरी कठोर लॉकडाऊननंतर १४ हजार जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत देशातील केवळ सहा टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. 

प्रेक्षकांवर मर्यादा आल्यास....
टोकियो ऑलिंपिकची तिकीटविक्री कोरोना महामारी सुरू होण्यापूर्वी वेगाने सुरू होती. आता प्रेक्षकांवर मर्यादा आल्यास लॉटरी पद्धतीने प्रसंगी तिकीटधारकांची निवड करणे भाग पडेल. त्याचबरोबर त्यानंतरही किती तिकीटधारक स्टेडियमवर येतील याबाबतही काहीजण शंका घेत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या