पॅरालिंपिकच्या अगोदरच आणखी सात शहरांत आणीबाणी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 August 2021

कोरोना प्रादुर्भावाचा सामना करत ऑलिंपिक स्पर्धा पार पाडली. आता जपान संयोजन समितीसमोर पॅरालिंपिक स्पर्धेचे आव्हान आहे. त्यातच संसर्गाचे प्रमाण वाढत असल्यामुळे जपान सरकारने आणखी सात नव्या शहरांत आणीबाणी जाहीर केली आहे.

टोकियो - कोरोना प्रादुर्भावाचा सामना करत ऑलिंपिक स्पर्धा पार पाडली. आता जपान संयोजन समितीसमोर पॅरालिंपिक स्पर्धेचे आव्हान आहे. त्यातच संसर्गाचे प्रमाण वाढत असल्यामुळे जपान सरकारने आणखी सात नव्या शहरांत आणीबाणी जाहीर केली आहे. पॅरालिंपिक स्पर्धेस आठवडा शिल्लक असताना ही घडामोड घडली आहे.

संसर्ग रोखण्यासाठी आपत्कालीन उपाययोजनांत मद्यविक्रीस अगोदरच बंदी घातलेली आहे. आता तर सर्व दुकाने रात्री ८ पर्यंत बंद करणे अनिवार्य केले आहे. टोकियोसह पाच शहरांमध्ये अगोदरपासून सुरू असलेली आणीबाणी ३१ ऑगस्ट रोजी संपणार आहे, परंतु ही आणीबाणी १२ सप्टेंबरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाची जपानमध्ये आलेली ही पुढची लाट भयंकर आहे. अगोदरही इतक्या प्रमाणात अशी लाट आपण अनुभवली नव्हती. गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. बार आणि रेस्टॉरंटसह मोठ्या शॉपिंग मॉल आणि डिपार्टमेंट स्टोअर्सनाही ग्राहकांची संख्या मर्यादित ठेवण्यात सांगण्यात आले आहे, असे जपानच्या साथ रोग नियंत्रण विभागाचे मंत्री यशुतोशी निशीमुरा यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून जपानमध्ये दररोज २० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. त्यांच्यासाठी ही विक्रमी वाढ आहे.


​ ​

संबंधित बातम्या