खोलीत एकट्यानेच मद्यसेवन करा; ऑलिंपिक क्रीडानगरीत कठोर नियम

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 July 2021

कोरोना महामारी रोखण्यासाठी टोकियोत आणीबाणी अंमलात आली आहे. त्यामुळे मद्यविक्रीवरही निर्बंध आहेत. ऑलिंपिक क्रीडानगरीत मद्य उपलब्ध असेल; मात्र त्याचे सेवन एकट्याने आपल्या खोलीमध्ये करावे, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

टोकियो - कोरोना महामारी रोखण्यासाठी टोकियोत आणीबाणी अंमलात आली आहे. त्यामुळे मद्यविक्रीवरही निर्बंध आहेत. ऑलिंपिक क्रीडानगरीत मद्य उपलब्ध असेल; मात्र त्याचे सेवन एकट्याने आपल्या खोलीमध्ये करावे, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

क्रीडानगरीत कोणत्याही परिस्थितीत मद्याचे गटाने एकत्र येत सेवन करता येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यासाठी केवळ मुक्कामाच्या रूममध्ये मद्य सेवन करता येईल; तसेच त्या वेळी अन्य कोणाला तिथे प्रवेश देता येणार नाही, हेही सांगण्यात आले आहे. 

संयोजकांनी क्रीडानगरी खुली करताना त्याबाबतचे कठोर नियम अंमलात आणण्याचे ठरवले आहे. डायनिंग रूममधील टेबलवर सहा जण खाण्याचा आस्वाद घेऊ शकतील, एवढी मोठी आहेत; पण त्यावर चौघेच असतील, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी केवळ एक खुर्ची असलेले टेबल आहे. 

सोहळ्याविना उद्घाटन
ऑलिंपिक क्रीडानगरीचे उद्घाटन  हा प्रत्येक स्पर्धेच्या वेळी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो; पण टोकियो स्पर्धेची क्रीडानगरी मंगळवारी खुली होताना कोणताही कार्यक्रम झाला नाही. ऑलिंपिक क्रीडानगरीच्या परिसरात वाहनांची वर्दळ काही प्रमाणात वाढली होती. या वेळी कोणालाही प्रवेश देण्यात आला नाही. हारुमी कॅनलशेजारी वसलेल्या या क्रीडानगरीतील छायाचित्रे टोकियोतील माध्यमांनी कॅनलच्या दुसऱ्या बाजूंनी घेतली. त्यात ४४ हेक्टरमध्ये वसलेल्या क्रीडा नगरीतील काही ठिकाणी राष्ट्रध्वज फडकत आहेत.


​ ​

संबंधित बातम्या