सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची मोहीम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 May 2021

दोन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर सुशील कुमार याला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे.

मुंबई / नवी दिल्ली - दोन ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत पदक जिंकलेला कुस्तीगीर सुशील कुमार याला ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जोरदार मोहीम उघडली आहे. छत्रसाल स्टेडियममध्ये कुस्तीगीरात झालेल्या झटापटीत माजी राष्ट्रीय कुमार विजेत्या कुस्तीगीराचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत सुशीलवरही आरोप दाखल करण्यात आला आहे.

मालमत्तेवरून झालेल्या वादंगात सुशील आणि मृत सागर यांच्या पाठीराख्यांत हाणामारी झाली. यात पाच जण जखमी झाले. यावेळी गोळीबारही झाला होता. माजी राष्ट्रीय कुमार विजेता असलेला सागर दिल्लीतील हेड कॉन्स्टेबलचा मुलगा आहे. पोलिस सुशीलचा शोध घेत आहेत. त्यांनी सुशीलच्या घरीही चौकशी केली आहे. 

सीसी टीव्हीमध्ये सुशील
सुशील कुमारने आपला या घटनेशी कोणताही संबंध नाही असे बुधवारी सांगितले होते, एवढेच नव्हे तर छत्रसाल स्टेडियममध्ये झालेल्या भांडणात कुस्तीगीर नव्हते, असा दावा केला होता, पण आता घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. त्या फुटेजमधील हाणामारीत सुशीलचा सहभाग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे, असे दिल्ली पोलिसांनी सांगितल्याचे समजते. पण यास दिल्ली पोलिसांनी अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही. 

हे असे काहीही घडलेले नाही. काही लोकांत झालेली ती मारामारी होती. त्यावेळी सुशीलने काहीही केले नाही. या सर्व प्रकरणाची चौकशी होत आहे. त्यामुळे मी याबाबत काहीही बोलणार नाही.
- सत्पाल, कुस्ती मार्गदर्शक तसेच सुशीलचे सासरे.


​ ​

संबंधित बातम्या