ऑलिंपिकवर सायबर हल्ला? सुरक्षा कर्मचाऱ्यांची माहिती झाली लिक

सकाळ वृत्तसेवा
Monday, 7 June 2021

टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेवर सायबर हल्ला झाल्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती लिक झाली असल्याचे समजते. त्यामुळे अनिश्चिततेच्या भोवऱ्यात असलेल्या स्पर्धेच्या सायबर सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला.

टोकियो - टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेवर सायबर हल्ला झाल्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती लिक झाली असल्याचे समजते. त्यामुळे अनिश्चिततेच्या भोवऱ्यात असलेल्या स्पर्धेच्या सायबर सुरक्षेबाबत प्रश्न निर्माण झाला. 

ऑलिंपिक स्पर्धेची माहिती प्रसारित करण्यासाठी फुजित्सू लिमिटेडने एक टूल तयार केले आहे. त्याचाच उपयोग करून स्पर्धेच्या सुरक्षेची जबाबदारी  असलेल्या, तसेच सायबर सुरक्षेच्या चाचणीत सहभागी झालेल्या १७० जणांची वैयक्तिक माहिती लिक झाल्याचे समजते. 

सरकारी कार्यालयांनी डाटा लिक झाल्याची तक्रार मे महिन्यात केली होती. आता स्पर्धा नजिक असताना सायबर हल्ले रोखण्यासाठी सुरक्षा जास्त काटेकोर करण्यात आली आहे. स्पर्धेच्या सायबर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेने लिक झालेली माहिती स्पर्धेशी संबंधित आहे का, तसेच या माहितीचा उपयोग करून काही हल्ला झाला आहे का, याबाबत टिप्पणी केली नाही. स्पर्धेशी संबंधित व्यक्ती, त्यांचे पद, ते कोणत्या संघटनेशी संलग्न आहेत, ही माहिती लिक झाली आहे. एकंदर ९० संस्था, संघटनांबाबतची माहिती लिक झाल्याचा अंदाज आहे.  त्यात संयोजक, स्थानिक प्रशासन व्यवस्था, स्पर्धेशी संबंधित मंत्रालय यांची माहितीही असल्याचे सांगण्यात येते.

स्पर्धेसंबंधित ७५ हजार इ-मेल अॅड्रेस लिक झाले असावेत. त्यात प्रमुख सरकारी अधिकाऱ्यांचेही इ-मेल आहेत, असाही अंदाज आहे.  

पुरस्कर्ते स्पर्धा पुढे ढकलण्यासाठी आग्रही?
ऑलिंपिक स्पर्धेचे जपानमधील पुरस्कर्ते स्पर्धा सप्टेंबर - ऑक्टोबरपर्यंत लांबणीवर टाकण्यासाठी संयोजकांवर दडपण आणत असल्याचा दावा होत आहे, पण संयोजकांनी त्यात तथ्य नसल्याचे सांगितले. जपानमधील ४७ हून जास्त कंपन्यांनी तीन अब्ज डॉलरहून जास्त रकमेचा पुरस्कार दिला आहे. त्यांतील प्रमुख कंपन्यांनी स्पर्धा पुढे ढकलण्याची मागणी केली असल्याची चर्चा आहे.


​ ​

संबंधित बातम्या