नीरज चोप्राच्या मार्गदर्शनाचा श्रेयवाद

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 August 2021

सैन्यदलात जवान आणि आता भारतीय अॅथलेटिक्स महासंघातील भालाफेक प्रशिक्षक काशिनाथ नाईक यांनी नीरज चोप्राला मार्गदर्शन केल्याचा दावा महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी फेटाळून लावला आहे.

नवी दिल्ली - सैन्यदलात जवान आणि आता भारतीय अॅथलेटिक्स महासंघातील भालाफेक प्रशिक्षक काशिनाथ नाईक यांनी नीरज चोप्राला मार्गदर्शन केल्याचा दावा महासंघाचे अध्यक्ष आदिल सुमारीवाला यांनी फेटाळून लावला आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये देशाला सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरजला काशिनाथ नाईकने मार्गदर्शन केले नसल्याचे सुमारीवाला यांनी म्हटले आहे.

नीरजला मी २०१५ ते २०१७ या काळात मार्गदर्शन केले होते या मताशी मी ठाम आहे. पोलंडमध्ये मी नीरजचा सहायक मार्गदर्शक म्हणून गेलो होतो, त्या वेळी गॅरी कॅल्वर्ट मुख्य मार्गदर्शक होते, असे काशिनाथ नाईकने म्हटले आहे.

काशिनाथ यांचा दावा
नीरजला मी मार्गदर्शन केले नाही, हे सुमारीवालांचे वक्तव्य ऐकून मला वाईट वाटले. त्यांना कदाचित माझ्याबाबत काही माहिती नसावी. २०१० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत पहिले ब्राँझपदक मिळवणारा मी पहिला भालाफेक खेळाडू होतो, असे काशिनाथ यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर २०१० च्या ढाक्यातील दक्षिण आशियाई स्पर्धेत मी सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर २०११ मध्ये झालेल्या जागतिक लष्कर गेम्समध्ये मला चौथे स्थान मिळाले होते. मला प्रसिद्धीची गरज नाही. मी यासंदर्भात नीरजशी बोललो आहे, असेही काशिनाथ म्हणाले.

गेल्या काही ऑलिंपिक स्पर्धांत भारतीय खेळाडू कुस्ती, बॉक्सिंग, नेमबाजी या खेळात पदके मिळवित आहेत, परंतु अॅथलेटिक्समध्ये पहिलेवहिले पदक मिळविण्यासाठी या टोकियो ऑलिंपिकची वाट पाहावी लागली.


​ ​

संबंधित बातम्या