ऑलिंपिकभोवती कोरोनाचा वाढता फेरा

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील कोरोनाची धास्ती वाढतच आहे. स्पर्धा जेमतेम एका आठवड्यावर असताना टोकियोत गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण आढळले. त्याचबरोबर ब्राझील ऑलिंपिक पथकाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्येही कोरोनाबाधित आढळले आहेत.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील कोरोनाची धास्ती वाढतच आहे. स्पर्धा जेमतेम एका आठवड्यावर असताना टोकियोत गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्ण आढळले. त्याचबरोबर ब्राझील ऑलिंपिक पथकाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमध्येही कोरोनाबाधित आढळले आहेत. 

आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांच्यात ऑलिंपिक पूर्वतयारीची बैठक होत असताना वाढत्या कोरोना रुग्णांनी टोकियो धास्तावले आहेत. 

टोकियोत बुधवारी १ हजार १४९ कोरोनाबाधित आढळले. सहा महिन्यांपूर्वी म्हणजे २२ जानेवारीस १ हजार १८४ रुग्ण आढळले होते. त्यानंतरची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. सलग २५ व्या दिवशीही रुग्णसंख्या वाढली, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे सुगा तसेच बाक यांनी स्पर्धेचे सुरक्षित संयोजन होईल याची ग्वाही दिल्यानंतरही त्याबाबत कोणास विश्वास वाटत नाही. 

ब्राझील संघाचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील सात कर्मचारी बाधित आढळले आहेत. हॉटेलमधील मुक्काम करीत असलेला ब्राझील संघ जैवसुरक्षित वातावरणात आहे. 

मात्र ब्राझील पथकाच्या सेवेत असलेले कर्मचारी बाधितांच्या संपर्कात आले असल्याची भीती व्यक्त होत आहे. 

हॉटेल कर्मचाऱ्यांमुळे धोका?
विविध संघांचा मुक्काम असलेल्या हॉटेलमधील कर्मचारी जैवसुरक्षित वातावरणात नाहीत. ते कामावर आल्यावर त्यांची कोरोना चाचणी होते. त्यातच काही कर्मचारी बाधित आढळले. 
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी जपानमध्ये दाखल होत असलेल्या प्रत्येकाची कोरोना चाचणी होत आहे. रोज या चाचणीत बाधित आढळत आहेत. दक्षिण आफ्रिका संघ आलेल्या विमानातील एकास बाधा झाल्याचे आढळल्याने संपूर्ण संघ विलगीकरणात आहे. 

नामांकितांची माघार सुरूच

  • अव्वल गोल्फपटू अॅडम स्कॉट याची माघार
  • जपान कोरोनाची साथ रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असताना ऑलिंपिक संयोजन चुकीचे असल्याची टिप्पणी
  • रॉजर फेडररची माघार, गुडघा दुखावल्याचे कारण

प्रतिबंधक नियमांचे पालन हवे
कोरोनाचा प्रसार होऊ नये तसेच जपानवासीयांची मनस्थिती समजून घेण्यासाठी ऑलिंपिकमधील प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे कसोशीने पालन करण्याची गरज आहे, असे सुगा यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीही कोरोना रोखण्यासाठी केलेल्या उपायांना साथ देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. बाक यांनी स्पर्धेसाठी येत असलेले ८५ टक्के खेळाडू तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, अशी ग्वाही दिली. ऑलिंपिक स्पर्धेसाठी ११ हजार खेळाडू जपानमध्ये येणार आहेत. गतवर्षी स्पर्धा लांबणीवर टाकली, त्यावेळी ऑलिंपिक संयोजन हा कोरोनावरील विजय मानला जाईल, अशी जपानची अपेक्षा होती. प्रत्यक्षात स्पर्धेला कोरोनाचे ग्रहण मोठ्या प्रमाणावर लागू नये अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

वाढत्या महिला क्रीडापटूंमुळे ऑलिंपिकबाबत महिलांना जास्त औत्सुक्य
हाँगकाँग - काही वर्षांपासून ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील महिलांचा रस वाढत आहे. या स्पर्धेबाबत औत्सुक्य असलेल्या पुरुष तसेच महिलांचे प्रमाण आता जवळपास समान आहे. निएल्सन स्पोर्टस््च्या सर्वेक्षणानुसार आता ४५ टक्के महिलांना तसेच ४८ टक्के पुरुषांना स्पर्धेबाबत रस आहे. ऑलिंपिकमधील महिलांच्या सहभागामुळे महिलांचा रस वाढल्याचेही या अहवालात म्हटले आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत पुरुषांच्या स्पर्धेत १६५, तर महिलांच्या स्पर्धेत १५६ सुवर्णपदकांसाठी चुरस असेल. याशिवाय मिश्र स्पर्धाही होणार आहेत. 

रशिया रग्बी संघातही कोरोनाचा शिरकाव
मॉस्को - रशियाचा रग्बी सेव्हन महिला संघ दोन दिवसांपासून कठोर विलगीकरणात आहे. संघासोबतचे मसाजर कोरोनाबाधित झाल्यामुळे हा निर्णय झाला आहे. संघातील सर्व सदस्यांची दोन दिवस चाचणी होईल. रिपोर्ट निगेटिव्ह आल्यासच संघास सरावाची मंजुरी देण्यात येईल. 

रिफ्यूजी संघाचे आगमन लांबले
टोकियो - रिफ्यूजी संघाचे टोकियोतील आगमन लांबवण्यात आले आहे. हा संघ सध्या कतारमध्ये सराव करीत आहे. संघासोबतच्या पदाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघ दोहातच सराव करीत राहील आणि त्यांची नियमितपणे चाचणी होईल. या संघात सीरिया, दक्षिण सुदान, एरित्रिआ, अफगाणिस्तान, इराण यांचा समावेश आहे. २९ खेळाडूंचा संघ १२ क्रीडा प्रकारात स्पर्धा करणार आहे. 

फुटबॉल - अर्जेंटिनास द. कोरियाने रोखले
सोल - दक्षिण कोरियाने ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेच्या फुटबॉल सराव सामन्यात अर्जेंटिनास २-२ असे रोखले. स्पर्धेच्या ड्रॉनुसार कोरिया आणि अर्जेंटिनात उपांत्य फेरीत लढत अपेक्षित आहे. या बरोबरीमुळे आम्ही अर्जेंटिनास हरवू शकतो हा विश्वास आला आहे, असे कोरियाचा अव्वल खेळाडू ली डाँग गेआँग याने सांगितले. लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझ जिंकलेल्या दक्षिण कोरियास गटात न्यूझीलंड, होंडुरास आणि रुमानियाचे आव्हान असेल.


​ ​

संबंधित बातम्या