राष्ट्रकुल स्पर्धेतील नेमबाजी, तिरंदाजी स्पर्धेवर पुन्हा नेम?

सकाळ वृत्तसेवा
Monday, 31 May 2021

भारतीय नेमबाजांची ऑलिंपिक पूर्वतयारीसुरु असताना राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने भारतास लक्ष्य केले. भारतात जानेवारीत होणाऱ्या राष्ट्रकुल नेमबाजी तसेच तिरंदाजी स्पर्धेतील पदके राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम पदक क्रमवारीत धरली जाणार नाहीत, असा निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतला असल्याचे समजते.

नवी दिल्ली - भारतीय नेमबाजांची ऑलिंपिक पूर्वतयारीसुरु असताना राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने भारतास लक्ष्य केले. भारतात जानेवारीत होणाऱ्या राष्ट्रकुल नेमबाजी तसेच तिरंदाजी स्पर्धेतील पदके राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या अंतिम पदक क्रमवारीत धरली जाणार नाहीत, असा निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतला असल्याचे समजते. 

बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजी तसेच तिरंदाजीचा समावेश न करण्याचा निर्णय झाला. भारताने नेमबाजी नसल्यास बहिष्काराचा इशारा दिला. राष्ट्रकुल महासंघाने झुकत भारताचा या दोन्ही खेळांच्या स्पर्धा घेण्याचा प्रस्ताव मान्य केला. या स्पर्धेतील पदके राष्ट्रकुल क्रीडा पदक क्रमवारीत जोडण्याचेही ठरले; मात्र गेल्या काही आठवड्यापासून बर्मिंगहॅम संयोजक भूमिका बदलत असल्याचे संकेत मिळत होते.

राष्ट्रकुल महासंघाच्या बैठकीत भारतास हा निर्णय कळवल्याचे समजते. यास भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव राजीव मेहता उपस्थित होते. भारतातील राष्ट्रकुल नेमबाजी तसेच तिरंदाजी स्पर्धेतील पदके स्पर्धेच्या क्रमवारीत गृहीत नसतील तर या स्पर्धा कशाला, अशी विचारणा मेहता यांनी केली आहे. 

महासंघाकडून इन्कार
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेची सांगता झाल्यावर एका महिन्याने संयोजन समिती नव्याने स्पर्धेची पदक क्रमवारी जाहीर करेल. त्यात राष्ट्रकुल नेमबाजी तसेच तिरंदाजी स्पर्धेतील पदकांचा समावेश असेल, असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने कळवल्याचे सांगितले जाते; मात्र त्याच वेळी देशातील कोरोना परिस्थिती पाहून भारतीय ऑलिंपिक संघटनेने याबाबत निर्णय घेण्याची सूचनाही केली आहे. 

सध्याच्या परिस्थितीत टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेची पूर्वतयारी अवघड होत आहे. पुढील वर्षी राष्ट्रकुल तसेच आशियाई क्रीडा स्पर्धाही आहे. त्याच्या पूर्वतयारीकडे लक्ष द्यावे लागेल. या परिस्थितीत राष्ट्रकुल नेमबाजी तसेच तिरंदाजीची स्पर्धा घेण्यास पुरेसा कालावधी नाही. या स्पर्धेच्या मूळ उद्दिष्टासच धक्का बसला आहे.
- राजीव मेहता, भारतीय ऑलिंपिक संघटनेचे सचिव


​ ​

संबंधित बातम्या