चिनी कंपनीचा पुरस्कार ऑलिंपिक संघटनेकडून रद्द

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 June 2021

भारतीय ऑलिंपिक संघटनेने ली निंग या चीनमधील कंपनीसह असलेला पुरस्कर्त्यांचा करार रद्द केला आहे. यापूर्वी टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू ली निंग या कंपनीचे बोधचिन्ह असलेले क्रीडासाहित्य वापरणार असल्याचे जाहीर झाले होते.

नवी दिल्ली - भारतीय ऑलिंपिक संघटनेने ली निंग या चीनमधील कंपनीसह असलेला पुरस्कर्त्यांचा करार रद्द केला आहे. यापूर्वी टोकियो ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू ली निंग या कंपनीचे बोधचिन्ह असलेले क्रीडासाहित्य वापरणार असल्याचे जाहीर झाले होते.

भारतीयांच्या भावना आम्ही जाणून आहोत. त्यामुळे आम्ही ली निंग कंपनीसह असलेला क्रीडा पोषाखाचा करार रद्द केला आहे. आता भारतीय खेळाडू ऑलिंपिक स्पर्धेत कोणत्याही ब्रँडचे चिन्ह नसलेला पोषाख परिधान करतील. यासंदर्भात केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आम्हाला बहुमोल मार्गदर्शन केले, असे भारतीय ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.

भारतीय खेळाडूंना त्यांच्या पोषाखाबद्दलच्या कोणत्याही प्रश्नास सामोरे जाण्याची वेळ येऊ नये, यासाठी हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. भारतीय खेळाडू तसेच मार्गदर्शकांनी स्पर्धेसाठी कसून तयारी केली आहे. त्यांना कोणताही त्रास नको, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. यासाठी सर्व क्रीडा महासंघाची साथ लाभली आहे, असेही संघटनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या