'खो-खो'च्या राष्ट्रीय खेळाडुवर केशकर्तनालय चालवण्याची वेळ

सकाळ वृत्तसेवा
Monday, 14 September 2020

 क्रिकेटसारखे ठराविक खेळ सोडले तर इतर खेळातील खेळाडुंची निवृत्तीनंतर किंवा खेळणं थांबवल्यानंतर परवड होत असल्याची अनेक उदाहरणं आहेत. अशीच वेळ खोखोच्या राष्ट्रीय खेळाडुवर आली आहे.

पटना - देशासाठी खेळणं हे स्वप्न घेऊन अनेक खेळाडू त्यांचं आयुष्य खर्ची घालतात. त्यासाठी जीवतोड मेहनतही करतात. क्रिकेटसारखे ठराविक खेळ सोडले तर इतर खेळातील खेळाडुंची निवृत्तीनंतर किंवा खेळणं थांबवल्यानंतर परवड होते. अशीच वेळ खोखोच्या राष्ट्रीय खेळाडुवर आली आहे. बिहार सरकार खेळ आणि खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक दावे करते. मात्र सत्यापासून हे दावे खूपच दूर आहेत. बिहारच्या सीतामढी इथल्या कमलेश कुमारची अवस्था हालाखीची झाली आहे. त्यानं खेळाच्या क्षेत्रात बरंच नाव कमावलं पण आज कुठल्यातरी अंधारात हरवल्यासारखी परिस्थिती झाली आहे. कमलेश त्याचा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आज केशकर्तनालय चालवतो.

सीतामढी इथल्या सुरगहिया गावात कमलेश राहतो. त्याने त्याचं आयुष्य खेळासाठी वाहून घेतलं. मात्र त्या बदल्यात मिळालं ते केवळं आणि केवळ वैफल्य. कमलेश हा खो खो चा खेळाडू आहे. आठ वेळा त्याने राष्ट्रीय पातळीवर बिहारचं नेतृत्व केलं. आसाम, पश्चिम बंगाल, हरियाणा, कर्नाटक, दिल्ली, महाराष्ट्रासह इनेक ठिकाणी त्यानं खो खोमधील कौशल्य दाखवलं. पण त्याचा खेळ, त्याचं कौशल्य दुर्लक्षित राहिलं. 

क्रीडा विषयक बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा sakalsports.com

कमलेश म्हणतो की, आतापर्यंत त्याला सरकार किंवा प्रशासनाने काहीच मदत केली नाही. त्यानं देणगी गोळा करून बाहेर खेळायला जाण्यासाठी प्रवास केला. इतकं होऊनही खेळाबद्दल असलेलं प्रेम कमी झालं नाही. त्याला आशा आहे की आता तरी प्रशासन जागं होईल. 

केशकर्तनालय चालवण्याबरोबरच कमलेश गावातील मुलांना खो-खो खेळण्याचं प्रशिक्षण देत आहे. त्या मुलांना चांगला खेळाडू बनवून कमलेशला स्वत:चं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. दरम्यान, कमलेशच्या परिस्थितीची माहिती मिळताच सीतामढीच्या जिल्हाधिकारी अभिलाषा कुमारी शर्मा यांनी कमलेशला सर्व प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन दिलं आहे. 


​ ​

संबंधित बातम्या