७ ऑगस्ट आता राष्ट्रीय भालाफेक दिन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 11 August 2021

देशाला अथलेटिक्समध्ये पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट हा दिवस या पुढे राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल, असा निर्णय अॅथलेटिक्स फेडरेशनने जाहीर केला.

नवी दिल्ली - देशाला अथलेटिक्समध्ये पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राच्या सन्मानार्थ ७ ऑगस्ट हा दिवस या पुढे राष्ट्रीय भालाफेक दिन म्हणून साजरा करण्यात येईल, असा निर्णय अॅथलेटिक्स फेडरेशनने जाहीर केला. याच दिवशी नीरजने देशासाठी ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले होते.

७ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून साजरा केला जाईल आणि या दिवशी संघटनेशी संलग्न असलेल्या सर्व राज्यांमध्ये भालाफेकीच्या स्पर्धा होतील. संघटनेशी ६०० हून अधिक जिल्हा संघटना संलग्न आहेत, तेथेही अशा स्पर्धा होतील, असे अॅथलेटिक्स महासंघाचे ललित भानोत यांनी सांगितले.

टोकियो ऑलिंपिकमध्ये नीरजने केलेला पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आहे. नीरजचे हे सुवर्णपदक देशातील नवोदितांसाठी स्फूर्तिदायी ठरेल, अशी आशाही भानोत यांनी व्यक्त केली.

भालाफेक या खेळाकडे आकर्षित झालेल्या मुलांना भाला आणि इतर सुविधा मिळाल्या, तर हा खेळ अधिक लोकप्रिय होईल आणि अनेक पदकविजेतेही तयार होऊ शकतात, असे भानोत यांनी नीरजच्या गौरव समारंभात काढले.
केरळ येथे २०१५ मध्ये झालेल्या राष्ट्रीय गेम्समध्ये आपण पाचवे आलो होतो. त्यानंतर माझी राष्ट्रीय शिबिरासाठी निवड करण्यात आली हाच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरला. या शिबिरात मला सर्व सुविधा मिळाल्या. योग्य आहाराचे नियोजन मिळाले, साहित्य मिळाले. चांगला भाला मिळाला आणि तेथूनच मी प्रगती करत गेलो, असे नीरजने सांगितले.

आता माझे लक्ष्य पुढील वर्षी होणाऱ्या विश्व अॅथलेटिक्स स्पर्धेवर आहे, असे नीरज म्हणाला.


​ ​

संबंधित बातम्या