क्रीडानगरीत कोरोनाबाधित आढळल्याने क्रीडा जगतात चिंतेचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 July 2021

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी तयार झालेल्या क्रीडानगरीत कोरोनाबाधित आढळल्याने क्रीडा जगतात चिंतेचे वातावरण आहे, पण महामारीची सध्याची तीव्रता लक्षात घेतल्यास क्रीडानगरीत काही बाधित आढळणारच, पण त्यांचे प्रमाण सध्या खूपच अल्प आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

टोकियो - ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी तयार झालेल्या क्रीडानगरीत कोरोनाबाधित आढळल्याने क्रीडा जगतात चिंतेचे वातावरण आहे, पण महामारीची सध्याची तीव्रता लक्षात घेतल्यास क्रीडानगरीत काही बाधित आढळणारच, पण त्यांचे प्रमाण सध्या खूपच अल्प आहे, याकडे तज्ज्ञांनी लक्ष वेधले.

अव्वल टेनिसपटू कोको गॉफ ही अमेरिकेतून प्रयाण करण्यापूर्वीच्या चाचणीत बाधित आढळली आहे. मात्र याचा अहवाल तिला जपानमध्ये पोहोचल्यावर मिळाला. क्रीडानगरीत काही बाधित आढळणार हा आमचा कयास होताच, असे आरोग्य तज्ज्ञ ब्रायन मॅकक्लोस्की यांनी सांगितले. क्रीडानगरीत दाखल होण्यापूर्वी केलेल्या चाचणीद्वारे तेथील बाधितांचे प्रमाण कमी करण्याचाच प्रयत्न आहे. प्रत्येक चाचणीने प्रत्यक्ष स्पर्धेतील बाधितांची संख्या कमी होईल. आता प्रत्यक्ष स्पर्धेत आढळणाऱ्या बाधितांची संख्या कदाचित आमच्या अंदाजापेक्षा कमी असेल, असे त्यांनी सांगितले.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी स्थापन केलेल्या वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीचे मॅकक्लोस्की प्रमुख आहेत. स्पर्धा कालावधीत कोणाही खेळाडूस बाधा होणार नाही याची शंभर टक्के ग्वाही देणे अशक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

क्रीडानगरीत जास्तीत जास्त मुक्काम असल्यास बाधित होण्याची शक्यता कमी असेल. आम्ही बाधितांना बाधित नसलेल्यांपासून दूर करीत आहोत. या स्पर्धेच्या कालावधीत किती बाधित असल्यास स्पर्धा यशस्वी मानता येईल, याबाबत अंदाज व्यक्त करणे चुकीचे आहे. प्रश्न स्पर्धेत किती बाधित होतात हा नसून, त्यांना किती लवकर हुडकले जाते हा आहे.

बाधितांच्या संपर्कात असलेल्यांना स्पर्धेतून बाद करण्याचा पर्याय नक्कीच विचारात आहे. खरे सांगायचे तर सर्वच पर्याय विचारात आहेत, पण सर्व उपाय कठोरपणे अमलात येत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यताही कमी आहे.  
- ब्रायन मॅकक्लोस्की, आरोग्य तज्ज्ञ.


​ ​

संबंधित बातम्या