Tokyo Olympic quota : छोट्या कुस्तीपटूंची मोठी कमाल

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 11 April 2021

सोनमने माजी ऑलिंपिक पदकविजेत्या साक्षी मलिकचा गेल्या काही चाचणी स्पर्धांत चार वेळा पराभव करून आपल्या ताकदीची आणि क्षमतेची साक्ष दिलेली आहे.

अलमाटी (कझाकस्तान) : येथे सुरू असलेल्या आशिया ऑलिंपिक पात्रता स्पर्धेत भारताच्या तरुण होतकरू महिला कुस्तीगीर अंशू मलिक आणि सोनम मलिक यांनी शानदार कामगिरी करत टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रता मिळवली. 19 वर्षीय अंशू आणि 18 वर्षीय सोमन यांनी ज्युनिअर ते सिनियर असा टप्पा ओलांडत हे भव्य यश मिळवले. त्यांच्यासाठी सिनियर असलेल्या विनेश पोगटने अगोदरच ऑलिंपिक पात्रता सिद्ध केलेली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या टोकियो ऑलिंपिकसाठी आता भारताच्या तीन महिला कुस्तीपटू पदकांसाठी कौशल्य पणास लावतील. 2019 च्या जागतिक स्पर्धेतून विनेश पात्र ठरलेली आहे. 

सोनमने माजी ऑलिंपिक पदकविजेत्या साक्षी मलिकचा गेल्या काही चाचणी स्पर्धांत चार वेळा पराभव करून आपल्या ताकदीची आणि क्षमतेची साक्ष दिलेली आहे. ६२ किलो हा गट आता आपल्यासाठी आहे, असे तिने हक्काने सिद्ध केले आहे. अंशूही तेवढ्याच क्षमतेची कुस्तीपटू आहे. अंतिम फेरीपर्यंत प्रवास करताना तिने अवघे दोनच गुण गमावले. तिन्ही लढती तिने सहजपणे जिंकल्या. 

अंशूने कोरियाच्या जिऊन उमचा पहिल्या फेरीत, त्यानंतर यजमान कझाकस्तानच्या इमा तिसिना आणि उपांत्य सामन्यात उझबेकिस्तानच्या शोखिंदा अखेमेदोवा यांचा पराभव केला. सोमनने चीनच्या जिया लुंगचा 5-2 असे सलामीच्या लढतीत लोळवल्यावर तैपेईच्या हसिम पिंग पेईवर तांत्रिक गुणांनी मात केली.

सोनमचा थरारक विजय

पहिल्या दोन सामन्यात शानदार विजय मिळवणाऱ्या सोनमला उपांत्य फेरीत मात्र कडवा जबरदस्त खेळ करून विजय मिळवावा लागला. या सामन्यात कझाकस्तानच्या अयुलेम कासेमोवाविरुद्ध सोनम 0-6 असे पिछाडीवर होती; परंतु त्यानंतर सलग नऊ गुण मिळवत तिने अंतिम सामन्याबरोबर ऑलिंपिकमध्ये खेळण्याचा आपला हक्क सिद्ध केला. सिनिअर गटात खेळण्यास आपण सज्ज आहोत, हे सोनमने दाखवून दिले, असे सोमनचे वैयक्तिक मार्गदर्शक अजमेर मलिक यांनी सांगितले.
 


​ ​

संबंधित बातम्या