अमित ऑलिंपिक स्वप्न साकारणार?

पीटीआय
Thursday, 6 May 2021

तीनदा राष्ट्रकुल विजेता झालेल्या कुस्तीगीर अमित धनकरची ऑलिंपिक पात्रतेची संधी अनेकदा हुकली आहे, आता याची भरपाई करण्याची संधी त्याला उद्यापासून (ता. ६) सुरू होणाऱ्या जागतिक ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेतून मिळणार आहे.

जागतिक ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धा आजपासून
नवी दिल्ली - तीनदा राष्ट्रकुल विजेता झालेल्या कुस्तीगीर अमित धनकरची ऑलिंपिक पात्रतेची संधी अनेकदा हुकली आहे, आता याची भरपाई करण्याची संधी त्याला उद्यापासून (ता. ६) सुरू होणाऱ्या जागतिक ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेतून मिळणार आहे.

अमित ३२ वर्षाचा आहे. कारकीर्द अंतिम टप्प्यात असताना त्याला ही संधी लाभली आहे. त्याच्यासह ११ भारतीय कुस्तीगीर सोफियातील या स्पर्धेत आपला कस पणास लावतील. अमित कारकिर्दीच्या सुरवातीस ६६ किलो गटात खेळत असे. त्यावेळी त्याला योगेश्वर दत्तला पराजित करण्यात अपयश आले होते. आता तो ७४ किलो गटात खेळतो. त्याने २०१९ च्या आशियाई स्पर्धेत रौप्य जिंकले होते.

टोकियो ऑलिंपिक पात्रतेपासूनही तो दूर राहणार असेच वाटत होते, पण आशियाई ऑलिंपिक पात्रतेसाठी स्थान मिळवलेला संदीप मान अपयशी ठरला आणि चाचणीत दुसऱ्या आलेल्या अमितला भारतीय कुस्ती महासंघाने संधी देण्याचे ठरवले. त्याच्यासह सर्वांसाठीच ऑलिंपिक पात्रतेची ही अखेरची संधी आहे. या स्पर्धेत प्रत्येक गटातून दोघे कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी पात्र ठरतील. अमितचा मार्ग खूपच खडतर आहे. या गटात ३६ कुस्तीगीर आहेत.


​ ​

संबंधित बातम्या