भारतीय बॉक्सर्सचा धडाका कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 19 April 2021

आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारतीयांनी पुरुष व महिला गटात धडाका कायम राखला आहे.

नवी दिल्ली - पोलंडमधील किएल्स येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या युवा बॉक्सिंग स्पर्धेत भारतीयांनी पुरुष व महिला गटात धडाका कायम राखला आहे. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी पाच जणांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिला गटात पाच जणींनी शेवटच्या आठ खेळाडूंच्या फेरीत प्रवेश केला असून पदक निश्चितीपासून फक्त एक विजय दूर आहेत.

आशियाई ज्युनियर विजेता बिस्वमित्र चोंगथाम याने पुरुष गटात ४९ किलो वजनी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठताना खोर्सोशाही परविझी याचा ५-० फरकाने धुव्वा उडवला. आर्यलंडच्या बॉक्सरविरुद्ध मणिपूरच्या बिस्वमित्र याने पूर्ण वर्चस्व राखले. भारतीय संघ पात्रता फेरीत त्याने खेलो इंडिया सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरला हरवले होते, आयरिश बॉक्सरविरुद्ध बिस्वमित्र याने तोच फॉर्म कायम राखला.

अंकित नरवाल याच्यासह उत्तर प्रदेशचा विशाल गुप्ता (९१ किलो) आणि भिवानी-हरियाना येथील सचिन (५६ किलो) यांनी पुरुष गटात शेवटच्या आठ खेळाडूंच्या फेरीत जागा मिळवली आहे.  आशियाई युवा रौप्यपदक विजेत्या हरियानाच्या अंकित याने पुरुषांच्या ६४ किलो गटात पोलंडचा बॉक्सर ऑलिव्हिएर झामोस्की याला ४-१ फरकाने हरवले. तथापि, विशाल आणि सचिन यांनी प्रत्येकी ५-० फरकाने सोपे विजय प्राप्त केले.


​ ​

संबंधित बातम्या