पावसामुळे कामगिरीवर प्रतिकूल परिणाम
मी पाऊस असताना कधीही स्पर्धा केलेली नाही. पाऊस नसता तर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य साध्य केले असते आणि पदकही जिंकले असते, असे कमलप्रीतने सांगितले.
मुंबई - मी पाऊस असताना कधीही स्पर्धा केलेली नाही. पाऊस नसता तर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीचे लक्ष्य साध्य केले असते आणि पदकही जिंकले असते, असे कमलप्रीतने सांगितले.
पहिल्या फेकीपासूनच नर्व्हस होते. त्यानंतर स्पर्धेवर पूर्ण लक्ष केंद्रित झाले असे वाटत असतानाच पाऊस सुरू झाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास खूपच कमी झाला, कारण मी यापूर्वी कधीही पाऊस सुरू असताना स्पर्धा केलेली नाही. त्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करण्यात अपयश आले असे ती म्हणाली. माझी सर्वोत्तम कामगिरी ६६ मीटर आहे, त्याची पुनरावृत्ती केली असती तर नक्कीच पदक जिंकले असते, असेही ती म्हणाली.
ऑलिंपिकमध्ये खूप चांगल्या कामगिरीचे स्वप्न होते, पण आंतरराष्ट्रीय स्पर्धा फारशा खेळलेले नाही. यापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळले आहे, त्या वेळीही पाऊस आला आणि माझी कामगिरी चांगली झाली नाही. कदाचित जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव असता तर यापेक्षा नक्कीच चांगली कामगिरी झाली असती.
आशियाई क्रीडा स्पर्धा सोडल्यास मी परदेशात केवळ जागतिक विद्यापीठ स्पर्धाच खेळले आहे असे ती म्हणाली. कमलप्रीतची आदर्श असलेली दोन वेळची जागतिक विजेती सँद्रा पेर्कोविक चौथी आली.