ऑलिंपिकमध्येही लसीकरण झालेल्या प्रेक्षकांना प्रवेश?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 1 June 2021

लसीकरण केलेल्या प्रेक्षकांना ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेश देण्याचा विचार संयोजक करीत आहेत. ऑलिंपिक स्पर्धा प्रेक्षकांविना घेतल्यास स्पर्धेचे आर्थिक गणित पूर्ण बिघडेल, हा विचार करून हा प्रस्ताव समोर आल्याचे समजते.

टोकियो - लसीकरण केलेल्या प्रेक्षकांना ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेसाठी प्रवेश देण्याचा विचार संयोजक करीत आहेत. ऑलिंपिक स्पर्धा प्रेक्षकांविना घेतल्यास स्पर्धेचे आर्थिक गणित पूर्ण बिघडेल, हा विचार करून हा प्रस्ताव समोर आल्याचे समजते.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा संयोजनाद्वारे माणसाने कोरोना विषाणूवर मात केली आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. या परिस्थितीत प्रेक्षकांविना स्पर्धा अयोग्य होईल, असा विचार होत आहे. त्यामुळे सुरुवातीस कोरोना चाचणीत निगेटिव्ह असलेल्या प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा विचार सुरू होता; पण आता लसीकरण झालेल्यांना कोणत्याही चाचणीविना प्रवेश देण्याबाबतचा पर्यायही विचारात घेतला जात आहे; मात्र याबाबतचा अंतिम निर्णय जूनच्या अखेरीस होईल. 

वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा कालावधीत २०० देशांतून येणाऱ्या ७८ हजार पाहुण्यांनी जपानच्या आरोग्य यंत्रणेची चिंता वाढवली आहे. ऑलिंपिक स्पर्धेसाठी दहा हजार आरोग्य कर्मचारी कायम सज्ज ठेवण्याची योजना होती; पण आता ती संख्या सात हजारवर आणण्याचे ठरले. जपानमधील कोरोना रुग्णांवर उपचारासाठी जास्त वैद्यकीय कर्मचारी आवश्यक असल्याचे सांगण्या आले. आमचा स्पर्धा संयोजनास कडवा विरोध आहे, असे वैद्यकीय कर्मचारी संघटनेच्या सचिव सुसुमो मोरिता यांनी सांगितले. ही संघटना पावणेदोन लाख नर्स आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करते. 

सध्या रोज सरासरी ७४० रुग्ण आढळत आहेत. ऑलिंपिकसाठी सरासरी रोज २३० डॉक्टर आणि ३१० नर्सची गरज असेल. त्यापैकी केवळ ८० टक्के निश्चित झाले आहेत, असा दावा केला जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या