#ThisDayThatYear : ब्राव्होच जेव्हा मित्र धोनीला चकवतो

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

धोनी आणि ब्राव्हो हे अनेक वर्षे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून एकत्र खेळले आहेत. त्यामुळेच त्यांना एकमेकांची विचार करण्याची पद्धत माहित झाली आहे. याचाच वापर करत त्याने धोनीला अडविले आणि सामन्यात विजय मिळवला.  

नवी दिल्ली : भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध अमेरिकेत आपला पहिला-वहिला क्रिकेट सामना खेळल्याला आज वर्ष पूर्ण झाले. या ऐतिहासिक ट्वेंटी20 सामन्यात रचल्या गेलेल्या विक्रमांबद्दल खूप चर्चा झाली. मात्र या सामन्यात ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधील जिवलग मित्र महेंद्रसिंह धोनीसाठी तयार केलेल्या रणनीतीची सर्वाधिक चर्चा करण्यात आली. 

या ट्वेंटी20 सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करत 245 धावांचा डोंगर उभारला. फ्लोरिडाचे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल असल्याने भारतानेसुद्धा या आव्हानाचा पाठलाग करताना सुरेख सुरवात केला. रोहित शर्माने 28 चेंडूंमध्ये 62 धावा केल्या तर लोकेश राहुलने नाबाद 110 धावा केल्या. राहुलला महेंद्रसिंह धोनीच्या 25 चेंडूंत 45 धावांची मोलाची साथ मिळाली. भारताला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या चेंडूत दोन धावांची गरज असताना ग्रेट फिनिशर महेंद्रसिंह धोनी फलंदाजी करत होता, तर त्याचाच मित्र ब्राव्हो गोलंदाजी करत होता. धोनी सामन्यात बरोबरी साधण्यासाठी एक धाव घेणार हे ब्राव्होने अचूक ओळखले आणि त्याने धोनीला ऑफ कटर टाकत एकही धाव घेऊ दिली नाही. परिणामी वेस्ट इंडिजने हा सामना अवघ्या एक धावेने जिंकला.

धोनी आणि ब्राव्हो हे अनेक वर्षे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून एकत्र खेळले आहेत. त्यामुळेच त्यांना एकमेकांची विचार करण्याची पद्धत माहित झाली आहे. याचाच वापर करत त्याने धोनीला अडविले आणि सामन्यात विजय मिळवला.  

या सामन्यात एकूण 489 धावा केल्या गेल्या. हा ट्वेंटी20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. तसेच या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंनी विक्रमी 32 षटकार खेचले होते.


​ ​

संबंधित बातम्या