ओम प्रकाशला सुवर्ण; हिना, मनू ऑलिंपिक कोटा मिळवण्यात अपयशी 

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

सर्वोत्तम कामगिरी 
कोरियात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत आठ पदके जिंकली आहेत. ही भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. 12 वर्षांपूर्वी झॅग्रेब स्पर्धेत भारताने सहा पदके जिंकली होती, त्यापेक्षा सरस कामगिरी झाली आहे. भारत आता तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशा आठ पदकांसह पदक क्रमवारीत कोरिया आणि चीनपाठोपाठ तिसरा आहे. 

मुंबई : ओम प्रकाश मिथारवालने जागतिक नेमबाजी स्पर्धेच्या वरिष्ठ गटातील भारताचे पहिले सुवर्णपदक जिंकले. त्याने 50 मीटर फ्री पिस्तूल प्रकारात ही कामगिरी केली; पण या प्रकारात ऑलिंपिक कोटा नव्हता. याशिवाय, महिलांच्या दहा मीटर पिस्तूल प्रकारात हिना सिद्धू आणि मनू भाकर ऑलिंपिक कोटाचा वेध घेण्यात अपयशी ठरले. 

23 वर्षीय ओम प्रकाशने या स्पर्धेतील भारताचे तिसरे सुवर्णपदक जिंकताना अंतिम टप्प्यात कामगिरी उंचावली. पहिल्या दोन फैरीतील 92 आणि 90 गुणांनंतर त्याने 95, 96 आणि 94 अशी कामगिरी करीत 564 गुणांची कमाई केली. त्याने रौप्यपदक विजेत्या मामिर मिकेच (सर्बिया) याला दोन गुणांनी मागे टाकले. ओम प्रकाशला सहकाऱ्यांची पुरेशी साथ लाभली नाही, त्यामुळे सांघिक पदक भारताकडून निसटले. 
मनू आणि हीनाकडून आज भारतास ऑलिंपिक कोटा अपेक्षित होता; पण पारंपरिक 40 ऐवजी 60 शॉटचे लक्ष्य झालेल्या या स्पर्धेत एकाग्रता राखणे आता जास्त अवघड असते; तसेच तंदुरुस्तीचाही जास्त कस लागतो. स्पर्धेत तेरावी आलेली मनू भारतीयांत सर्वोत्तम ठरली. 

सर्वोत्तम कामगिरी 
कोरियात सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताने आत्तापर्यंत आठ पदके जिंकली आहेत. ही भारताची या स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. 12 वर्षांपूर्वी झॅग्रेब स्पर्धेत भारताने सहा पदके जिंकली होती, त्यापेक्षा सरस कामगिरी झाली आहे. भारत आता तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि दोन ब्रॉंझ अशा आठ पदकांसह पदक क्रमवारीत कोरिया आणि चीनपाठोपाठ तिसरा आहे. 

कोल्हापूरच्या अभिज्ञाला ब्रॉंझ 
सौरभ चौधरी आणि अभिज्ञा पाटीलने कुमार गटातील 10 मीटर पिस्तूलच्या मिश्र दुहेरीत ब्रॉंझ जिंकले. आशियाई क्रीडा स्पर्धा विजेता सौरभ आणि क्रीडा प्राधिकरणातील अनिवासी विद्यार्थिनी असलेल्या अभिज्ञाने एकंदर 761 गुणांचा वेध घेतला. प्राथमिक फेरीत देवंशी राणा आणि अनमोल जैनने (765) दुसरा क्रमांक मिळवला होता; पण सौरभ-अभिज्ञाने अंतिम फेरीत 329.6 गुण नोंदवत ब्रॉंझ जिंकले. देवांशी - अनमोल (324.9) अंतिम फेरीत पाचवे आले. 

अन्य भारतीयांची कामगिरी 
- महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये हीना सिद्धू (29 - 571) आणि श्वेता सिंग (45 - 568) टॉप 25 मध्येही नाहीत 
- मनू, हीना, श्‍वेताचा समावेश असलेला भारतीय संघ चौथा 
- पुरुषांच्या 50 मीटर पिस्तूलमध्ये जितू राय 17 वा (552), तर मनजित (532) 56 व्या क्रमांकावर 
- ओम प्रकाश, जितू, मनजितचा भारतीय संघ पाचवा 


​ ​

संबंधित बातम्या