साईना, श्रीकांतची ऑलिंपिक पात्रता अवघडच

वृत्तसंस्था
Friday, 13 March 2020

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराजित झाल्यामुळे साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतला ऑलिंपिक पात्रता मिळवणे अवघडच जाईल, असे दिसत आहे. या स्पर्धेपूर्वी ऑलिंपिक पात्रता क्रमवारीत दोघेही वीसच्या बाहेर होते. आता पहिल्या फेरीतील पराभवाने त्यांची जास्तच पीछेहाट होण्याची शक्‍यता आहे.

मुंबई: ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराजित झाल्यामुळे साईना नेहवाल आणि किदांबी श्रीकांतला ऑलिंपिक पात्रता मिळवणे अवघडच जाईल, असे दिसत आहे. या स्पर्धेपूर्वी ऑलिंपिक पात्रता क्रमवारीत दोघेही वीसच्या बाहेर होते. आता पहिल्या फेरीतील पराभवाने त्यांची जास्तच पीछेहाट होण्याची शक्‍यता आहे.

ऑलिंपिक पात्रता क्रमवारीत साईना 22 वी; तर श्रीकांत 21वा आहे. ऑल इंग्लंड स्पर्धा सुपर एक हजार प्रकारातील आहे. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली असती, तरी त्यांच्या आशा उंचावल्या असत्या. पण, दोघेही सलामीला एकतर्फी लढतीत पराभूत झाले. आता आव्हान राखण्यासाठी साईना तसेच श्रीकांतला सुपर पाचशे अथवा साडेसातशे प्रकारातील एकतरी स्पर्धा जिंकण्याची गरज आहे. ऑलिंपिक पात्रतेच्या स्पर्धा कमी होत असताना हे घडण्याची शक्‍यताही कमी आहे.

ऑलिंपिक पात्रतेपूर्वी आता सुपर पाचशे अथवा सुपर साडेसातशे प्रकारातील तीनच स्पर्धा शिल्लक आहेत. इंडिया ओपन, मलेशिया ओपन, सिंगापूर ओपन यापैकी किती स्पर्धा होतील, हा प्रश्‍न आहे. जागतिक बॅडमिंटन महासंघाने ऑलिंपिक पात्रता कालावधी वाढवणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे साईना, श्रीकांतची ऑलिंपिक पात्रता अवघडच दिसत आहे.
 


​ ​

संबंधित बातम्या