Wimbledon 2019 : गतविजेत्या जोकोविचची विजयी सलामी 

वृत्तसंस्था
Monday, 1 July 2019

विंबल्डन गतविजेत्या तसेच अग्रमानांकित नोव्हाक जोकोविच याने विंबल्डन जेतेपद राखण्याच्या मिशनला मोठ्या आत्मविश्वासाने प्रारंभ केला. त्याने जर्मनीचा अनुभवी प्रतिस्पर्धी फिलिप कोलश्‍क्रायबर याचे आव्हान 6-3, 7-5, 6-3 असे परतवून लावले. 

विंबल्डन 2019 : विंबल्डन गतविजेत्या तसेच अग्रमानांकित नोव्हाक जोकोविच याने विंबल्डन जेतेपद राखण्याच्या मिशनला मोठ्या आत्मविश्वासाने प्रारंभ केला. त्याने जर्मनीचा अनुभवी प्रतिस्पर्धी फिलिप कोलश्‍क्रायबर याचे आव्हान 6-3, 7-5, 6-3 असे परतवून लावले. 

ऑल इंग्लंड क्‍लबच्या सेंटर कोर्टवर जोकोविचने नेहमीच्या शैलीत सफाईदार खेळ केला. कारकिर्दीत 60व्या वेळी ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत खेळणाऱ्या प्रतिस्पर्ध्याविरुद्ध त्याला दुसरा सेट वगळता फारसे झगडावे लागले नाही. त्याने शारीरिक संतुलन साधत मारलेले अशक्‍यप्राय परतीचे फटके प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. 32 वर्षीय जोकोविच पाचव्या विंबल्डन जेतेपदासाठी प्रयत्नशील आहे. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर अमेरिकेच्या डेनिस कुड्‌ला याचे आव्हान असेल. 

सिमोनाची सरशी 
महिला एकेरीत रुमानियाच्या सिमोना हालेपने बेलारूसच्या अलियाक्‍सांड्रा सॅस्नोविचवर 6-4, 7-5 अशी मात केली. दुसऱ्या सेटमध्ये तिने 2-5 अशी पिछाडी भरून काढली. गेल्या वर्षी फ्रेंच ओपन जिंकलेल्या सिमोनाला दुखापतीने त्रस्त केले आहे. सामन्यादरम्यान ती घसरून पडली. त्यामुळे तिला डावा गुडघा आणि घोट्यावर दोन वेळा उपचार करून घ्यावे लागले. तिला पायावर टेपिंगही करून घ्यावे लागले. सुदैवाने तिची दुसऱ्या फेरीची लढत बुधवारी आहे. सॅस्नोविचने दोन्ही सेटमध्ये सुरवातीलाच सर्व्हिस गमावली. 
वॉव्रींका, अँडरसन विजयी 

पुरुष एकेरीत अन्य प्रमुख स्पर्धकांमध्ये स्वित्झर्लंडचा स्टॅन वॉव्रींका आणि गत उपविजेता दक्षिण आफ्रिकेचा केव्हिन अँडरसन यांनी आगेकूच केली. वॉव्रींकाने भक्कम सर्व्हिस आणि सफाईदार बॅकहॅंडच्या जोरावर बेल्जियमच्या रूबेन बेमेलमन्सचा 6-3, 6-2, 6-2 असा पराभव केला. 34 वर्षीय वॉव्रींकाला विंबल्डन वगळता इतर तिन्ही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांत विजेतेपद मिळाले आहे. दोन वेळा उपांत्यपूर्व फेरी ही त्याची येथील सर्वोत्तम कामगिरी आहे. दीड तासाच्या आत विजय मिळविताना त्याने 26 विनर्स नोंदविले. 171व्या स्थानावर असलेल्या रुबेनने डावखुऱ्या पात्रता फेरीतून आगेकूच केली होती. 
अँडरसन याने फ्रान्सच्या पिएर-ह्यूजेस हर्बर्टचा 6-3, 6-4, 6-2 असा पराभव केला. हर्बर्ट हा प्रामुख्याने दुहेरीतील खेळाडू आहे. तो ब्रिटनच्या अँडी मरे याच्या साथीत सहभागी झाला आहे. 

नाओमीला पुन्हा पराभवाचा धक्का 

द्वितीय मानांकित नाओमी ओसाका आणि सहावा मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव यांच्या पराभवामुळे विंबल्डनचा पहिला दिवस सनसनाटी ठरला. गतविजेत्या नोव्हाक जोकोविच याने मात्र मोहिमेला विजयी सुरवात केली. 
कझाकस्तानच्या युलिया पुतीनत्सेवाने जपानच्या नाओमीला 7-6 (7-4), 6-2 असे हरविले. युलियाला यापूर्वी पाच प्रयत्नांत येथे एकदाही दुसऱ्या फेरीच्या पुढे जाता आले नव्हते. अमेरिकन व ऑस्ट्रेलियन ओपन जिंकल्यानंतर नाओमीच्या कामगिरीला उतरती कळा लागली आहे. 3-1 अशा आघाडीनंतर तिने पकड गमावली. युलिया 39व्या क्रमांकावर आहे. तिच्याविरुद्ध 38 चुका केल्याचा नाओमीला फटका बसला. 

जर्मनीच्या 22वर्षीय झ्वेरेवला चेक प्रजासत्ताकाच्या 25वर्षीय यिरी वेसेली याने 4-6, 6-3, 6-2, 7-5 असे हरविले. पाच प्रयत्नांत झ्वेरेव प्रथमच पहिल्या फेरीत हरला. डावखुरा वेसेली 106व्या क्रमांकावर आहे. "टॉप हंड्रेड'मध्ये नसलेल्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध संभाव्य विजेता झ्वेरेव हरणे धक्कादायक ठरले. मुख्य म्हणजे वेसेली सहा प्रयत्नांत येथे एकदाही पहिल्या फेरीत हरलेला नाही. 

संबंधित बातम्या