IPL 2020 : शेर थक गया है?

रविराज गायकवाड
Saturday, 3 October 2020

धोनीच्या फॅन्सना तर तो कधीच रिटायर होऊ नये, असं वाटतं. पण, प्रत्येक खेळाडूची थांबण्याची एक वेळ असते. ती सुनील गावस्करची होती, कपिल देवची होती, सचिन तेंडूलकरचीही होती. विराट कोहलीचीही असणार आहे.  अर्थातच ती धोनीचीही असणार आहे. ती वेळ आलीय असं मला म्हणायचं नाही. पण, ती वेळ कधी ना कधी तरी येणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

पुणे : टायगर जिंदा है| शेर बुढा हो गया है, मगर शिकार नही भुला| शेर बुढा हुआ तो भी शेर, शेर होता है | अशी अनेक पल्लेदार वाक्य धोनीच्या फॅन्सकडून सोशल मीडियावर शेअर होताना दिसतात. गेल्या दोन-तीन वर्षांत भारतात बेरोजगारी, शेतीचे प्रश्न या पेक्षा धोनीच्या रिटायरमेंटची चर्चा जास्त झाली असेल. धोनीच्या फॅन्सना तर तो कधीच रिटायर होऊ नये, असं वाटतं. पण, प्रत्येक खेळाडूची थांबण्याची एक वेळ असते. ती सुनील गावस्करची होती, कपिल देवची होती, सचिन तेंडूलकरचीही होती. विराट कोहलीचीही असणार आहे.  अर्थातच ती धोनीचीही असणार आहे. ती वेळ आलीय असं मला म्हणायचं नाही. पण, ती वेळ कधी ना कधी तरी येणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

सन रायझर्स हैदराबादच्या विरुद्धच्या मॅचमध्ये धोनी मैदानावर थकला. मुळात धोनीला असं कधीच पाहिलं नव्हतं. त्यामुळं त्याच्या चाहत्यांसाठीच नव्हे तर, सगळ्यांसाठीच ते नवं होतं. या खेळाडूला कधी क्रॅम्प आल्याचं आठवत नाही. कधी त्यानं रनर घेतल्याचं आठवत नाही. विकेटसच्या मागं, 300 (वन डेमध्ये 50 ओव्हर्सचे 300 बॉल्स)  उठाबशा काढूनही तो चित्त्यासारखा धावताना दिसायचा. भारतात मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम, कोलकाता अशा दमट शहरांच्या मैदानावर प्रचंड घाम गेल्यानंतरही तो कधी थकल्याचं दिसलं नाही. अपवाद असतीलही पण, आयपीएलमधील सनरायझर्स विरुद्धच्या मॅचमधलं चित्र धोनीच्या चाहत्यांनाच नव्हे, तर स्वतः धोनीला विचार करायला लावणारं आहे. परिस्थिती काहीही असो. म्हणजे, यूएईमधील हवामान, हवेतला दमटपणा, हे सगळं असलं तरी, मैदानावर थकलेला माणूस धोनी होता हे लक्षात घ्यायला हवं.

IPL 2020: यॉर्करनं प्रतिस्पर्ध्यांना रोखणारा आईला चिकन विकण्यापासून थांबवू शकत नाही

धोनीच्या शरिरानं पहिल्यांदा असे संकेत दिले आहेत असं नाही. गेल्या आयपीएलमध्येही त्याला पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यानं एक मॅचही गमावली होती. त्या मॅचमध्ये सुरेश रैनानं धुरा सांभाळली होती. वर्ल्ड कपच्या तोंडावर धोनीनं कोणतिही रिस्क घेतली नव्हती. वर्ल्ड कपमध्ये धोनी, रिषभ पंत, दिनेश कार्तिक असे तीन विकेट किपर्स घेऊन आपण मैदानात उतरलो होतो. त्या वेडेपणावर बोलायला नको. पण, आपण वर्ल्ड कपची सेमिफायनल हरलो, ती देखील धोनी दोन इंचांनी कमी पडल्यामुळंच. त्यानंतर धोनी पुन्हा मैदानावर दिसला नाही. तो दिसला ते थेट आयपीएलमध्ये त्यातही धोनी थकल्यासारखा दिसतोय हे कोणीच नाकारणार नाही. एक आठवड्याच्या विश्रांतीनंतरच्या मॅचमध्येही अशी परिस्थिती असेल तर, ते स्वीकारावं लागेल. (कितीही डाय हार्ट फॅन असले तरी)

IPL 2020 खिल्ली उडवलेला तेवतिया झाला हिरो

चेन्नईचा परफॉर्मन्स

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा परफॉर्मन्स कधी नव्हे इतका खालावला आहे. म्हणजे दर वर्षी आरसीबीला आपण ज्या ठिकाणी पाहतो होतो. तिथं आता आपल्याला चेन्नई सूपर किंग्ज दिसते हे दुदैवी. चेन्नईला कधीच टॉप फोरच्या खाली आपण फारसं पाहिलेलं नाही. यंदाच्या टीम परफॉर्मन्सची कारणं अनेक आहेत. यात धोनीच्या नेतृत्वावर अजिबात शंका नाही. कॅप्टन म्हणून, तो जगातला महान खेळाडू आहे. मग, आंतरराष्ट्रीय मॅच असो किंवा आयपीएल. पण, संघात तरुण रक्ताचे ताज्या दमाचे खेळाडू किती आहे? असा प्रश्न विचारला तर, खरचं आठवावे लागतात. त्याचे परिणाम फिल्डिंगमध्येही दिसतात. सांघिक खेळात दोष एकट्या दुकट्याचा नसतो. तो संपूर्ण टीमचा असतो. 

तो पुन्हा येईल!

मुळात धोनीचा खेळ असा आहे की, फक्त बघत रहावसं वाटतं. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या दुसऱ्या मॅचमध्ये धोनीनं शेवटच्या ओव्हरमध्ये तीन सिक्स मारल्या होत्या. मॅच केव्हाच हातातून गेली होती. पण, धोनीच्या त्या सिक्स पाहून पोट भरलं आणि मॅच हरल्यानंतरही चेन्नईच्या चाहत्यांना शांत झोप लागली. पण, धोनीनं अनेकदा अशा प्रसंगांमधून जात स्वतः पुन्हा पुन्हा सिद्ध केलंय. त्या वेळची परिस्थिती वेगळी असेल तरी तो धोनी आहे हेही विसरून चालणार नाही. मुळात सगळं जग आशेवर चाललंय. त्यामुळं The King will rore again अशी आशा जरूर बाळगूया. चेन्नईनं आयपीएल नाही जिंकली तरी, धोनीला मैदानावर पुन्हा पुन्हा पहायला मिळेल अशी आशा बाळगूयात.


​ ​

संबंधित बातम्या