पेनल्टीबाबतचा निर्णय  माझा - गेराथ साऊथगेट

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 13 July 2021

युरो अंतिम सामन्यात इंग्लंडच्या पराभवास तीन पेनल्टी गमावणाऱ्या रॅशफोर्ड, सँचो आणि साका यांना जबाबदार धरण्यात येत आहे; परंतु शुटआऊटमध्ये कोणी पेनल्टी घ्यायची हा निर्णय माझा होता आणि तोही मी सराव सत्रातील कामगिरीवरून घेतला होता.

लंडन - युरो अंतिम सामन्यात इंग्लंडच्या पराभवास तीन पेनल्टी गमावणाऱ्या रॅशफोर्ड, सँचो आणि साका यांना जबाबदार धरण्यात येत आहे; परंतु शुटआऊटमध्ये कोणी पेनल्टी घ्यायची हा निर्णय माझा होता आणि तोही मी सराव सत्रातील कामगिरीवरून घेतला होता, असे स्पष्टीकरण देत इंग्लंड संघाचे मार्गदर्शक गेराथ साऊथगेट यांनी सर्व जबाबदारी स्वतःवर घेतली.

सराव शिबिरातून आमचे खेळाडू कसा सराव करत होते त्यावरून पेनल्टी शूटआऊटमध्ये कोणी पेनल्टी मारायची हे ठरवले होते. आम्ही संघ म्हणून जिंकलो आणि अंतिम सामनाही संघ म्हणून जिंकण्याचा प्रयत्न केला होता, असे साऊथगेट म्हणाले.

संघाच्या पराभवावर साऊथगेट यांनी मात्र मोठी निराशा व्यक्त केली. या अंतिम सामन्यात आम्ही चमकदार सुरुवात केली होती, परंतु उत्तरार्धात निराशा केली. पराभवाची निराशा असली तरी संपूर्ण स्पर्धेत केलेल्या खेळाचे खेळाडूंना श्रेय द्यायला हवे, त्यांनी सर्वस्व दिले होते, असे साऊथगेट म्हणाले.

उत्तरार्धात इटलीने चांगला खेळ केला, आम्ही चेंडूवर आमच्याकडे ताबा ठेऊ शकलो नाही. तेथेच आम्ही कमी पडलो, असेही त्यांनी सांगितले.


​ ​

संबंधित बातम्या