दु:खात असतानाही ज्वाला झाली ट्रोल; भावूक पोस्टसह दिलं उत्तर

सकाळ स्पोर्ट्स ऑनलाईन टीम
Friday, 12 February 2021

शोक व्यक्त करण्याऐवजी काही नेटकऱ्यांनी तिच्या ट्विटवर वर्णभेदी टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. यावर ज्वालानं भावनिक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

भारतीय बॅडमिंटन स्टार ज्वाला गुट्टा सध्याच्या घडीला कठीण प्रसंगातून जात आहे. तिच्या आजीचे नुकतेच निधन झाले. यासंदर्भातील माहिती तिने ट्विटच्या माध्यमातून दिली. यावर शोक व्यक्त करण्याऐवजी काही नेटकऱ्यांनी तिच्या ट्विटवर वर्णभेदी टिप्पणी केल्याचे पाहायला मिळाले. यावर ज्वालानं भावनिक पोस्टच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. ज्वालाची आजी चीनमध्ये वास्तव्यास होती. याच ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

या सर्व प्रकारानंतर ज्वालाने ट्विटरच्या माध्यमातून भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिलंय की, 'मी माझ्या आजीच्या जाण्याने दु:खी आहे. ती चीनमध्ये वास्तव्यास असल्याचा उल्लेख केल्यानंतर माझ्यावर वर्णभेदी टिप्पणी केली जात आहे. कोविडच्या ऐवजी चिनी व्हायरस असा उल्लेख का केला नाही, असे काही लोक मला विचारत आहेत.

एक समाज म्हणून आपण कर्तव्य बजावत आहे का? आपल्याकडील सहानुभूती कुठे गेली? आपण ज्या दिशेने वाटचाल करत आहोत हे लाजीरवाणे आहे. यापूर्वी तिने एका नेटकऱ्याबद्दल संताप व्यक्त केला होता. वर्णभेदी टिप्पणी करुन उगाच माझ्या कुटुंबियांच्या वाट्याला जाऊ नका, असे तिने म्हटले होते.  

ज्वालाने शुक्रवारी सकाळी आपल्या अधिकृत ट्विट अकाउंटवरुन आजीचे निधन झाल्याची बातमी शेअर केली. यात तिने लिहिले होते की,  'अम्मा गुजर गई चीन में सीएनवायच्या परिस्थितीत. माझी आई महिन्यातून किमान दोन वेळा तिला भेटायला जायची. परंतु कोरोनामुळे तिला भेटता आले नाही. कोविडने आपल्याला वर्तमानात रहायला शिकवले. आपल्याकडून जे होईल ते आपल्या लोकांसाठी वर्तमानातच करायला हवे, असा उल्लेख तिने आपल्या पोस्टमध्ये केला होता.  


​ ​

संबंधित बातम्या