आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ठरल्याप्रमाणेच होणार!

सुशांत जाधव
Friday, 31 July 2020

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत नियोजित सहा कसोटी मालिका स्थगित करण्याची नामुष्की आयसीसीवर ओढावली होती.

 कोरोना विषाणूच्या संकटजन्य परिस्थितीमुळे अनेक स्पर्धेची वेळापत्रके कोलमडली. क्रिकेट जगताला देखील याचा फटका बसला. ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आयसीसीला घ्यावा लागला. क्रिकेटमधील आगामी नियोजित मालिकांवरही याचा परिणाम होणार आहे. पण जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अर्थात ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिपच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नाही, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. चॅम्पियनशिपचा पहिला हंगामाला 2019 पासून सुरुवात झाली होती. ही स्पर्धा मार्च  2021 पर्यंत चालणार आहे. दरम्यानच्या दोन वर्षांच्या  कालावधीत 9 संघ हा घरच्या मैदानावर तीन आणि परदेशी मैदानात तीन अशा पद्धतीने कसोटी मालिका खेळणार आहेत. यातील आघाडीच्या दोन संघात जून 2021 मध्ये इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानात फायनल मुकाबला रंगणार आहे.

ICC Test WC : पाकची धुलाई केली तरी भारताची बरोबरी करणं इंग्लंडला जमणार नाही

कोरोनाजन्य परिस्थितीमुळे इतर मालिकांच्या वेळापत्रकात बदल झाला असला तरी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप नियोजित वेळेत होईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. कोरोनाजन्य परिस्थितीमुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत नियोजित सहा कसोटी मालिका स्थगित करण्याची नामुष्की आयसीसीवर ओढावली होती. इतर मालिकांचा विचार करण्यापूर्वी या मालिकांना  प्राथमिकता देण्यात येणार असल्याचे आयसीसीने स्पष्ट केले आहे. यात श्रीलंका विरुद्ध इंग्लंड, पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात प्रत्येकी एक कसोटी मालिका, बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका, श्रीलंका विरुद्ध बांगलादेश आणि बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेचा समावेश आहे. स्थगित स्पर्धा खेळवण्यासंदर्भा आम्ही संबंधित देशांच्या क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत आहोत, अशी माहिती आयसीसी क्रिकेट संचालन महाप्रबंधक ज्योफ एलरडायस यांनी दिली. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारतीय संघ आघाडीवर आहे. भारतीय संघाच्या नावे  360 गुण जमा आहेत. ऑस्ट्रेलिया 296, इंग्लंड 226 , न्यूझीलंड 180 अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान 140 गुणांसह पाचव्या तर श्रीलंका संघ 80 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडीजने इंग्लंड दौऱ्यावरील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकत खाते उघडले होते. त्यांच्या नावे 40 गुणांची नोंद आहे. दक्षिण आफ्रिका 24 गुणासह आठव्या स्थानावर असून बांगलादेश अद्यापही खाते उघडण्याच्या प्रतिक्षेतच आहे. 


​ ​

संबंधित बातम्या