दक्षिण-उत्तर कोरिया लढत ना प्रेक्षक...ना थेट प्रक्षेपण...

वृत्तसंस्था
Tuesday, 15 October 2019

-विश्वकरंडक फुटबॉल पात्रता फेरीत दक्षिण आणि उत्तर कोरिया यांच्यातील सामना प्रेक्षकांशिवाय पार पडला. या लढतीचे थेट प्रक्षेपणही झाले नाही.

- स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या एकाही पाठीराख्याला स्थान नव्हते, तसेच एकाही परदेशी पत्रकाराला प्रवेश देण्यात आला नव्हता

- या सामन्याचे डीव्हीडी चित्रीकरण सादर करण्याचे आश्‍वासन उत्तर कोरियाने दिले आहे, असे दोन्ही देशांच्या एकीकरण मंत्रालयाने सांगितले

सोल - खेळाच्या मैदानावर एकत्रीकरणाच्या चर्चा जोर धरत असल्या, तरी दक्षिण आणि उत्तर कोरिया या दोन देशांतील संबंध अजूनही तणावाचे आहेत. या पार्श्‍वभूमीवर या दोन देशांत विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतला ऐतिहासिक सामना झाला. ना प्रेक्षक, ना थेट प्रक्षेपण, ना परदेशी मीडिया अशा "ब्लॅकऑउट'मध्ये झालेला हा सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. 
प्यॉंगयंग किम सुंग स्टेडियमवर हा सामना झाला. स्टेडियममध्ये दोन्ही संघांच्या एकाही पाठीराख्याला स्थान नव्हते, तसेच एकाही परदेशी पत्रकाराला प्रवेश देण्यात आला नव्हता. इंग्लिश प्रीमियर लीगमधील टॉटनहॅम क्‍लबकडून खेळणारा सोंग ह्युन मिन दक्षिण कोरियाचे नेतृत्व करत होता, पण त्याचा खेळ कसा झाला हे त्याच्या पाठीराख्यांना पाहता आले नाही. त्याला गोलही करता आला नाही. 
या सामन्याचे डीव्हीडी चित्रीकरण सादर करण्याचे आश्‍वासन उत्तर कोरियाने दिले आहे, असे दोन्ही देशांच्या एकीकरण मंत्रालयाने सांगितले. फुटबॉल क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या या सामन्यात काय घडतेय हे केवळ फिफाच्या एएफसी संकेतस्थळावरून मजकूर समालोचनातून समजत होते. 
या समालोचनातून जे काही अपडेट मिळाले, त्यातून सामन्यात फारच कमी यलो कार्ड मिळाली आणि कमी राखीव खेळाडू मैदानात आणण्यात आले. या सामन्याचे रेफ्री असलेल्या करातच्या अब्दुलरेहमान अल जासीम यांनी उत्तर कोरियाकडून रि यंग जिक आणि रि यून चोल यांना; तर दक्षिण कोरियाकडून किम युंग आणि किम मिन यांना पिवळे कार्ड दाखवले. 
सामन्यासाठी केवळ संयोजक आणि मोजकेच पदाधिकारी उपस्थित होते. त्यात फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फाटिनो यांचा समावेश होता. सामन्यापूर्वी सकाळीच ते उत्तर कोरियात दाखल झाले होते. ब्लेझरवर त्यांनी उत्तर कोरियाचा राष्ट्रध्वज लावला होता. दक्षिण कोरियाचा संघ प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसह सोमवारी येथे दाखल झाला होता. या सर्वांनी त्याचे मोबाईल फोन दक्षिण कोरिया दूतावासात ठेवून मैदानाकडे प्रयाण केले. 
 


​ ​

संबंधित बातम्या