US Open : तापट किर्गीऑस तप्त हवामानात विजयी 

वृत्तसंस्था
Saturday, 1 September 2018

पंचांच्या बोलण्याचा परिणाम नाही... 
​किर्गीऑसने स्पष्ट केले, की "मला उन्हामुळे त्रास होत होता. मला मीठ हवे होते. ते मिळावे म्हणून मी पंचांशी बोललो. त्यांनी जे काही सांगितले त्याचा माझ्यावर कोणताच परिणाम झाला नाही.' चांगला खेळ करावा असे त्यांनी मला सांगितल्याचे संकेत हास्यास्पद आहेत, असेही तो म्हणाला. 

न्यूयॉर्क : ऑस्ट्रेलियाचा प्रतिभासंपन्न पण वादग्रस्त टेनिसपटू नीक किर्गीऑस याने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत नाट्यमय पद्धतीने आगेकूच केली. तापट स्वभावाच्या किर्गीऑसची तप्त वातावरणात दमछाक झाली होती. तो सामना सोडून देण्याच्या बेतात होता. 

किर्गीऑसची फ्रान्सच्या पिएर-ह्यूजेस हर्बर्ट याच्याशी लढत होती. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये त्याच्या सर्व्हिसवर गंडांतर आले. त्या वेळी तो सामना सोडून देण्याच्या मनःस्थितीत होता. त्याचवेळी "चेअर अंपायर' महंमद लाह्यानी यांनी त्याच्याशी संवाद साधला. ते खुर्चीवरून खाली उतरले आणि त्याच्याशी काही बोलले. त्यानंतर किर्गीऑसने विचार बदलला आणि सामना पुढे सुरू ठेवला. त्या वेळी तो 4-6, 0-3 असा पिछाडीवर होता. मग त्याने पुढील 25 पैकी 19 गेम जिंकले. त्याने 4-6, 7-6 (8-6), 6-3, 6-0 असा विजय मिळविला. पंच त्याच्याशी नेमके काय बोलले हे कळू शकले नाही, पण किर्गीऑसचा हुरूप वाढला की काय अशी चर्चा आणि थोडा  वादही झाला. 

पंचांनीच नियम मोडला : हर्बर्ट 
वास्तविक नियमानुसार पंचांना खेळाडूंशी अशा प्रकारे संवाद साधण्याची परवानगी नाही. मला किर्गीऑसला मदत करायची होती, इतकेच पंच लाह्यानी यांनी सांगितले. हर्बर्टने मात्र यास आक्षेप घेतला. पंचांची कृती योग्य नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्याने केली. तो म्हणाला, की "हे काही पंचांचे काम नव्हते. ते प्रशिक्षक आहेत असे मला वाटत नाही. त्यांनी पंचांचे काम करण्यासाठी खुर्चीवरच बसून राहायला हवे होते. खरे तर ते चांगले पंच आहेत. ते फार चुका करीत नाहीत.' 

संयोजकांकडून आढावा 
दरम्यान, मोसमातील अखेरच्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेचे संयोजन करणाऱ्या "युनायटेड स्टेट्‌स टेनिस असोसिएशन'कडून (युस्टा) या प्रसंगाचा आढावा घेण्यात येत आहे. पंचांना किर्गीऑस काय म्हणतो ते सुरवातीला नीट ऐकू आले नाही. किर्गीऑसला वैद्यकीय मदतीची गरज लागू शकेल अशी काळजी त्यांना वाटली. त्यामुळे ते आपल्या जागेवरून खाली उतरले. त्याचवेळी सामना खेळण्यातील रस निघून गेला तर मुख्य पंच म्हणून तुझ्यावर कारवाई करावी लागेल, असेही त्यांनी बजावले. 

पंचांच्या बोलण्याचा परिणाम नाही... 
किर्गीऑसने स्पष्ट केले, की "मला उन्हामुळे त्रास होत होता. मला मीठ हवे होते. ते मिळावे म्हणून मी पंचांशी बोललो. त्यांनी जे काही सांगितले त्याचा माझ्यावर कोणताच परिणाम झाला नाही.' चांगला खेळ करावा असे त्यांनी मला सांगितल्याचे संकेत हास्यास्पद आहेत, असेही तो म्हणाला. 


​ ​

संबंधित बातम्या