जागतिक मैदानी स्पर्धा : प्रेक्षकांना मिळणार थंडा थंडा कुल-कुल अनुभव 

नरेश शेळके
Friday, 27 September 2019

- पारंपारीक पद्धतीपेक्षा 40 टक्के उर्जेची बचत 
- स्टेडियमपासून एक किलोमीटरवर उर्जा केंद्र 
- उर्जा केंद्रातून पाईपलाईनद्वारे पाणी स्टेडियमपर्यंत आणण्यात येते 
- त्यानंतर थंड झोत स्टेडियममध्ये सोडण्यात येतो. 

दोहा : तापमानाचा आणि दमटपणाचा ऍथलिट्‌ससह सर्वांनाच सामना करावा लागेल, याची जाणीव असल्याने जागतिक मैदानी स्पर्धेच्या स्थानिक आयोजकांनी यावर तोडगा काढीत स्पर्धेचे मुख्य स्थान असलेल्या खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमला चक्क वातानुकूलीत केले आहे. त्यामुळे स्टेडियमच्या बाहेर घामाच्या धारा लागतात, मात्र स्टेडियममध्ये प्रवेश करताच थंडा-थंडा कुल-कुल असाच अनुभव येतो. 

हे स्टेडियम इनडोअर नसले, तरी जवळ-जवळ अर्ध्यापेक्षा अधिक झाकले आहे (ओपन रुफ स्टेडियम). त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा उन्हाचा किंवा दमटपणाचा सामना करावा लागणार नाही. ही वातानुकूलीत यंत्रणा बसविण्यात आल्यानंतर एप्रिल महिन्यात आशियाई ऍथलेटिक्‍स आणि त्यानंतर झालेल्या डायमंड लीगच्या वेळी चाचणी घेण्यात आली.

ती चाचणी यशस्वी ठरली. सध्या याविषयी बरीच चर्चा सुरु आहे. युरोप व अमेरिकन ऍथलिट्‌सने या यंत्रणेचे स्वागत केले, तर लांब पल्याच्या शर्यतीत वर्चस्व गाजविणाऱ्या आफ्रिकन धावपटूंनी सावध प्रतिक्रीया दिली आहे. थंड वातावरणात कामगिरीवर आणि शरीरावर परीणाम होऊ शकतो, अशी भिती त्यांना आहे. याविषयी या यंत्रणेचे प्रमुख आणि कतार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सौद अब्दुल घनी म्हणाले, हे तंत्रज्ञान अशा पद्धतीने विकसीत करण्यात आले की इव्हेंटनुसार तपमानात बदल होईल, त्यामुळे लांब पल्याच्या किंवा स्प्रींट शर्यतीत भाग घेणाऱ्या ऍथलिट्‌सने घाबरण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे प्रेक्षकांची संख्या किती आहे, यानुसारही प्रेक्षकगॅलरीत तपमानात बदल होत राहिल.

 आता येथे जागतिक मैदानी स्पर्धा होत असली तरी तीन वर्षानंतर होणाऱ्या फिफा विश्व करंडक फुटबॉलच्यादृष्टीने ही तयारी सुरु आहे. त्यावेळी कडक उन्हाचा आणि दमटपणाचा फुटबॉलपटूंना त्रास होऊ नये यासाठी ही यंत्रणा आतापासून उभारण्यात आली आहे. अशी यंत्रणा प्रत्येक स्टेडियममध्ये उभारण्यात येत आहे, अशी माहिती डॉ. घनी यांनी दिली. 

काय आहे यंत्रणा 
- पारंपारीक पद्धतीपेक्षा 40 टक्के उर्जेची बचत 
- स्टेडियमपासून एक किलोमीटरवर उर्जा केंद्र 
- उर्जा केंद्रातून पाईपलाईनद्वारे पाणी स्टेडियमपर्यंत आणण्यात येते 
- त्यानंतर थंड झोत स्टेडियममध्ये सोडण्यात येतो. 
- थंड झोत सोडण्यासाठी 500 नोझल्स लावण्यात आले आहे. 
- 23 ते 26 अंश तपमान राहिल.


​ ​

संबंधित बातम्या