ISL : नव्या प्रशिक्षकांसमोर अशक्यप्राय आव्हान

वृत्तसंस्था
Friday, 25 January 2019

हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) केरळा ब्लास्टर्स एफसी आणि एफसी पुणे सिटी या दोन संघांनी नव्या प्रशिक्षकांना पाचारण केले आहे. त्यामुळे या संघांमध्ये चैतन्य निर्माण होईल, पण मोसमाच्या प्रारंभी ठेवलेले प्ले-ऑफ प्रवेशाचे ध्येय साध्य होण्याची शक्यता कमी आहे.

हिरो इंडियन सुपर लिगमधील (आयएसएल) केरळा ब्लास्टर्स एफसी आणि एफसी पुणे सिटी या दोन संघांनी नव्या प्रशिक्षकांना पाचारण केले आहे. त्यामुळे या संघांमध्ये चैतन्य निर्माण होईल, पण मोसमाच्या प्रारंभी ठेवलेले प्ले-ऑफ प्रवेशाचे ध्येय साध्य होण्याची शक्यता कमी आहे.

आयएसएलला 40 दिवसांच्या ब्रेकनंतर शुक्रवारी प्रारंभ होत आहे. कोचीत एटीकेविरुद्ध खेळणाऱ्या ब्लास्टर्सच्या डग-आऊटमध्ये चाहत्यांना नवा चेहरा दिसेल. ब्लास्टर्सने संघाच्या खराब कामगिरीमुळे इंग्लंडचे माजी गोलरक्षक डेव्हिड जेम्स यांना निरोप दिला. मोहिमेची गाडी रुळावर आणण्यासाठी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचे माजी प्रशिक्षक नेलो विंगाडा यांना पाचारण करण्यात आले आहे. उरलेल्या सामन्यांत त्यांच्याकडे सुत्रे असतील. 

मोसमाच्या मध्यास प्रशिक्षक बदलणे किती यशस्वी ठरेल असा प्रश्न या पार्श्वभूमीवर निर्माण होतो. त्यासाठी ब्लास्टर्सला मागे वळून आपल्याच इतिहासाकडे पाहावे लागेल. अशा बदलांमुळे अपेक्षित निकाल साध्य होत नाहीत हे त्यांच्या लक्षात येईल.

पोर्तुगालचे विंगाडा हे यंदाच्या मोसमातील दुसरे नवे प्रशिक्षक आहेत. त्याआधी पुणे सिटीने स्पेनच्या मिग्युएल अँजेल पोर्तुगाल यांना केवळ तीन सामने झाल्यानंतर हटवून प्रद्युम्न रेड्डी यांची हंगामी नियुक्ती केली होती. रेड्डी यांच्याकडे सुत्रे गेल्यानंतर संघाच्या वाटचालीत किंचीत फरक पडला. आता इंग्लंडच्या फील ब्राऊन यांच्याकडे सुत्रे आली असली तरी प्ले-ऑफचे स्वप्न दूरच असेल. पुणे सिटी 12 सामन्यांतून 11 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.

गेल्या आयएसएल मोसमात ब्लास्टर्ससह तीन संघांनी मोसमाच्या मध्येच मुख्य प्रशिक्षक बदलले. ब्लास्टर्सने सात सामन्यांत केवळ एक विजय मिळाल्यानंतर मँचेस्टर युनायटेडचे माजी प्रशिक्षक रेने म्युलेस्टीन यांना बाहेरचा रस्ता दाखविला. नॉर्थइस्टने जोओ डे डेयूस यांना हटविले. एटीकेने सर्वाधिक बदल केले. आधी टेडी शेरींगहॅम यांना हटवून अॅश्ली वेस्टवूड यांना तांत्रिक संचालक म्हणून पाचारण करण्यात आले.  मग मोसम संपला तेव्हा आयर्लंडचा स्ट्रायकर रॉबी कीन याच्याकडे खेळाडू-प्रशिक्षक अशी दुहेरी जबाबदारी होती.

विंगाडा आपल्या नियुक्तीबद्दल म्हणाले की, उर्वरीत मोसमासाठी ब्लास्टर्सची सुत्रे घेतल्यामुळे मी रोमांचित झालेलो नाही. भारतातील गुणवान खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणे नेहमीच आनंददायी ठरले आहे. आगामी सामन्यांत संघासाठी चांगले निकाल लागतील अशी मला आशा आहे.

विंगाडा यांच्या नियुक्तीनंतर प्ले-ऑफ पात्रतेसाठी जोर लावण्याची अपेक्षा बाळगली जाईल, पण आपल्यासमोरील आव्हान किती खडतर आहे याची त्यांना कल्पना असायला हवी. मुळात विंगाडा यांना आधी संघाचे मनोधैर्य उंचावण्याची गरज असेल.

ब्राऊन हे पुणे सिटीला अधिकाधिक वरचा क्रमांक मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतील, पण प्ले-ऑपमधील स्थान म्हणजे खूप मोठी अपेक्षा फार घाईने बाळगण्यासारखे आहे.


​ ​

संबंधित बातम्या