Asian Games 2018 : नीरजची सोनेरी भालाफेक 

वृत्तसंस्था
Monday, 27 August 2018

"मी सहज जिंकलो असे वाटत असले तरी स्पर्धा अतिशय चुरशीची होती. अतिशय कठोर मेहनत केली होती आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यावरच सर्व लक्ष केंद्रीत केले होते. एक महान व्यक्तिमत्व असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपयी यांना मी माझे सुवर्णपदक समर्पित करतो. 
- नीरज चोप्रा, सुवर्णपदक विजेता, भालाफेक 

जाकार्ता, ता. 27 ः दोन वर्षांपूर्वी विश्‍व ज्युनिअर आणि यंदा राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकीत प्रथमच सुवर्णपदक मिळवून दिल्याने उद्‌घाटन सोहळ्यात भारताचा ध्वजधारक असलेला नीरज चोप्रा सुवर्णपदकाच्या अपेक्षेस खरा उतरला. एकवीस वर्षीय नीरजच्या सुवर्णपदकांमुळे भारताचा आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदकाचाही दुष्काळ संपुष्टात आला. ऍथलेटिक्‍स स्पर्धेचा तिसरा दिवस भारतासाठी सुखद ठरला. नीरजच्या सुवर्णपदकाशिवाय भारताने तीन रौप्यपदके जिंकली. 

दोन वर्षांपूर्वी पोलंडमध्ये झालेल्या विश्‍व ज्युनिअर स्पर्धेतील कामगिरीमुळे नीरज सर्वप्रथम प्रकाश झोतात आला. त्याचा रिओ ऑलिंपिकचा प्रवेश थोडक्‍यात हुकला होता. तेव्हापासून भारतीय क्रीडा क्षेत्रातील पोस्टर बॉय असलेल्या नीरजने भारतीय संघाचे परदेशी प्रशिक्षक गॅरी क्‍लॅवेर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. गॅरी चीनला गेल्यानंतर नीरज माजी विश्‍वविक्रमवीर जर्मनीचे उव हॉन यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रशिक्षण घेऊ लागला. तेव्हापासून तो सातत्याने 80 मीटरच्या वरच फेक करीत आहे.

आजही पहिल्याच प्रयत्नात त्याने 83 मीटरपेक्षा अधिक फेक करून सुवर्णपदकाचे संकेत दिले होते. तिसऱ्या प्रयत्नात त्याने भाला हवेत भिरकावला. अपेक्षित उंची मिळाली आणि भाला नव्वद मीटर रेषेजवळ पडला. नीरजने आनंदाने हात उंचावले, भारतीय पाठीराख्यांनी जल्लोष सुरू केला आणि त्याच वेळी स्क्रीनवर 88.06 मीटर असे अंतर झळकले. त्याच वेळी नीरजचे सुवर्णपदक निश्‍चित झाले होते. कारण इतर ऍथलिट्‌स त्याच्या आसपासही नव्हते. चीनच्या लीयु क्विझेनने रौप्यपदक जिंकले. नदीम अर्शदने ब्रॉंझपदक जिंकताना पाकिस्तानला 1962 च्या स्पर्धेनंतर प्रथमच पदक मिळवून दिले. 

भाला 
वजन ः 800 ग्रॅम 
लांबी ः 2.6-2.7 मीटर 

स्पर्धेपूर्वी नीरज (2018) 
विश्‍व क्रमवारी ः 7 (87.43 मीटर) 
आशिया ः 1 

9 स्पर्धांत 85 मीटरपेक्षा अधिक 
85.94 मी. - मार्च - पतियाळा 
86.47 मी. - एप्रिल - गोल्ड कोस्ट 
87.43 मी. - मे - दोहा (कतार) 
85.17 मी. - जुलै - सोत्ताविले (फ्रान्स) 
85.69 मी. - जुलै - लॅपीनलहाती (फिनलॅंड) 

यापूर्वीची भारताची कामगिरी 
1951 - दिल्ली - पारसा सिंग - रौप्य - 50.38 मी. 
1982 - दिल्ली - गुरतेज सिंग - ब्रॉंझ - 71.58 मी. 

नीरजची आजची फेक 
83.46, फाऊल, 88.06, 83.25, 86.36, फाऊल 

"मी सहज जिंकलो असे वाटत असले तरी स्पर्धा अतिशय चुरशीची होती. अतिशय कठोर मेहनत केली होती आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकण्यावरच सर्व लक्ष केंद्रीत केले होते. एक महान व्यक्तिमत्व असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपयी यांना मी माझे सुवर्णपदक समर्पित करतो. 
- नीरज चोप्रा, सुवर्णपदक विजेता, भालाफेक 


​ ​

संबंधित बातम्या