पुण्यातील जलतरणपटूची आत्महत्या मोबाईलच्या हट्टापायी?

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 June 2019

- गळफास घेऊन केली आत्महत्या.

 

पुणे : जलतरण स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सात सुवर्णपदके पटकाविणारा नामांकित जलतरणपटू साहिल जोशी (वय 21) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. शुक्रवारी दुपारी एक वाजता कोथरूड येथे ही घटना घडली. मोबाईलच्या हट्ट्पायी साहिलने हे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

कोथरूडमधील राजहंस नगरमध्ये साहिल जोशी याचे घर आहे. साहिल शुक्रवारी घरी एकटाच होता. तर वडील ऑफिसला गेले होते. त्यांनी साहिलच्या मोबाईलवर फोन करून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी घरी येऊन पाहिले. तेव्हा साहिलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, दुपारी दोन वाजता कोथरूड पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. साहिलच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, अशी माहिती कोथरुड पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिली. 

साहिलने राष्ट्रीय स्तरावर बॅकस्ट्रोक प्रकारात चमकदार कामगिरी केली होती. त्याचे कर्नाटक हायस्कूल, गरवारे महाविद्यालय येथे त्याचे शालेय व माध्यमिक शिक्षण झाले होते. सध्या तो नऱ्हे येथील काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षामध्ये शिक्षण घेत होता. नवले महाविद्यालयातच बुधवारी साहिलचा सत्कार करण्यात आला होता.

दरम्यान, साहिल सतत मोबाईलमध्ये गुंतून राहात असे. मोबाईलमुळेच ही घटना घडली असण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 


​ ​

संबंधित बातम्या