विदर्भस्तरीय दौड स्पर्धेत नागराज खुरसणेने मारली बाजी

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 January 2019

नागपूर : दुसऱ्या खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय दौड स्पर्धेत पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत नागराज खुरसणे तर महिलांच्या शर्यतीत आंतर विद्यापीठ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या प्राजक्ता गोडबोलेने अव्वल स्थान पटकाविले. या दौडीने यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. 

नागपूर : दुसऱ्या खासदार क्रीडा महोत्सवातंर्गत घेण्यात आलेल्या विदर्भस्तरीय दौड स्पर्धेत पुरुषांच्या दहा किलोमीटर शर्यतीत नागराज खुरसणे तर महिलांच्या शर्यतीत आंतर विद्यापीठ स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या प्राजक्ता गोडबोलेने अव्वल स्थान पटकाविले. या दौडीने यंदाच्या खासदार क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. 

सकाळी महापौर नंदा जिचकार यांनी यशवंत स्टेडियम समोरून शर्यतीला झेंडी दाखवली. हवेत चांगलाच गारवा असल्याने सुरुवातीला जवळ-जवळ सर्व प्रमुख धावपटू एकत्र धावत होते. अर्ध्या टप्यानंतर नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळात सराव करणाऱ्या आणि मध्य रेल्वेत कार्यरत असलेल्या नागराजने आघाडी घेण्यास सुरुवात केली आणि 33 मिनिटे 21 सेकंदात शर्यत पूर्ण करून 31 हजार रुपयांचा पुरस्कार जिंकला. नागराजचा सहकारी संदेश शेबेला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. यंदा अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रॉस कंट्री स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या प्राजक्ता गोडबोलेला महिलांत आव्हानच नव्हते. जय क्‍लबमध्ये सराव करणाऱ्या प्राजक्ताने 36 मिनिटे 58 सेकंदात अव्वल स्थान पटकाविले. "येत्या 20 तारखेला मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेच्या सरावाचा भाग म्हणून या स्पर्धेत सहभागी झाली. आता राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणे हे माझे लक्ष्य आहे, असे प्राजक्ताने शर्यतीनंतर सांगितले. 

या मुख्य शर्यतीसोबत नागरिकांसाठी पाच किलोमीटरची समृद्धी दौडही आयोजित करण्यात आली होती. यास अपेक्षीत प्रतिसाद दिसून आला नाही. शिक्षण मंचचे संजय दुधे, माफसूचे कुलगुरु डॉ. पातुरकर, उर्मीला डबीर, माजी महापौर प्रवीण दटके आणि संयोजक संदीप जोशी यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरीत करण्यात आले. समृद्धी दौडीत पोलिस प्रशिक्षण केंद्र (सर्वाधिक प्रवेशिका-800), विहान चांगदे (सर्वात लहान स्पर्धक-मुले), स्वरा ढवळे (सर्वात लहान स्पर्धक-मुली), दिवाकर भोयर (सर्वात वयस्कर - पुरुष), साधना कपाळे (सर्वात वयस्कर - महिला), नॅशनल फायर सर्व्हीस कॉलेज (शिस्तबद्ध संघ), सर्वेश व्यवहारे, पंखुडी कळमकर, जुनून ग्रुप (सर्वोत्कृषट वेशभुषा) यांना पुरस्कार देण्यात आले. 

निकाल : 

(विदर्भस्तरीय दौड - 10 किलोमीटर) : पुरुष : नागराज खुरसणे (मध्य रेल्वे नागपूर - 33मि.21 सेकंद), संदेश शेबे (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ - 33 मि.49 सेकंद), रिषभ तिवसकर (काटोल - 33 मि.52 सेकंद), शुभम राठोड (बुलढाणा), शेषराज राऊत (नवमहाराष्ट्र क्रीडा मंडळ), निलेश हटवार (ट्रॅकस्टार), जसवीर सिंग (पीजीटीडी), शुभम मेश्राम (नवमहाराष्ट्र), देवेंद्र चिकलोंडे (118 प्रादेशीक सेना), विठठल जरे (बुलडाणा). 
महिला (10 कि.मी.) : प्राजक्ता गोडबोले (जय क्‍लब - 36 मि.58 सेकंद), निकीता राऊत (ट्रॅकस्टार - 38 मि.04 सेकंद), शीतल बारई (ट्रॅकस्टार - 39 मि.36 सेकंद), यामिनी ठाकरे (शहर पोलिस), गीता चाचेरकर (लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळ), तृप्ती पटले (ग्रीन सिटी क्‍लब), नेहा सिंग (नवमहाराष्ट्र), श्रेया किरमोरे (ट्रॅकस्टार), स्वाती पंचबुधे (ब्लॅकबर्ड क्‍लब), दिव्या नखाते (लेमदेव पाटील महाविद्यालय मांढळ).


​ ​

संबंधित बातम्या