Ranji Trophy 2019 : मुंबईचा बडोद्यावर 309 धावांनी दणदणीत विजय 

वृत्तसंस्था
Thursday, 12 December 2019

यंदाच्या रणजी मोसमाच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने बडोद्याविरुद्ध तब्बल 309 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पृथ्वी शॉने या सामन्यात शानदार द्विशतक झळकाविले. 

मुंबई : यंदाच्या रणजी मोसमाच्या पहिल्याच सामन्यात मुंबईने बडोद्याविरुद्ध तब्बल 309 धावांनी दणदणीत विजय मिळवला आहे. पृथ्वी शॉने या सामन्यात शानदार द्विशतक झळकाविले. 

मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात बंदीनंतर रणजी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या पृथ्वी शॉने 62 चेंडूंमध्ये 66 धावांची खेळी केली. भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने 145 चेंडूंत 79 धावा करत संघाची धावसंख्या वाढविली. त्यानंतर खालच्या फळीत एस झेड मुलानी याने सर्वाधिक 89 धावा केल्या. त्याने 141 चेंडूंमध्ये 63.12च्या सरासरीने धावा केल्या. शार्दुल ठाकूर, शशांक आणि तुषार देशपांडे यांच्या योगदानामुळे मुंबईने पहिल्या डावात 431 धावा केल्या. बडोद्याकडून भार्गव भट आणि युसूफ पठाण यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. 

बडोद्याच्या सलामीवीरानेही कमाल केली. केदार देवधरने 190 चेंडूंमध्ये 160 धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. त्यानंतर मात्र, कोणत्याही फलंदाजाने त्याला साथ दिली नाही. बडोद्याचे सहा फलंदाज एकेरी धावसंख्या करुन बाद झाले. कर्णधार कृणाल पंड्या केवळ एक धाव करुन बाद झाला. मुंबईकडून एस झेड मुलानीने सर्वाधिक सहा बळी घेतले. त्याच्या अचूक गोलंदाजीमुळे बडोद्याचा डाव 307 धावांत गुंडाळला गेला. 

शंभरहून जास्त धावांची आघाडी असताना मुंबईच्या दुसऱ्या डावात पृथ्वीने कमाल केली. त्याने तुफान फलंदाजी करत 19 चौकार आणि सात षटकारांची बरसात करत द्विशतक ठोकले. हे कमी म्हणून कर्णधार सूर्यकुमार यादव यानेही बडोद्याच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि 12 चौकार, पाच षटकारांसह 70 चेंडूंत 102 धावा केल्या. दुसऱ्या डावात मुंबईने 409 धावांवर डाव घोषित केला. 

विजयासाठी पाचशेहून अधिक धावांचे आव्हान होते तरीही बडोद्याच्या एकही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. अभिमून्य सिंह आणि दीपक हुडा या दोघांनीच 50पेक्षा जास्त धावा केल्या. मुलानीने या डावातही अचूक गोलंदाजी करत चार बळी टिपले. फलंदाजांच्या अपयशामुळे मुंबईने बडोद्यावर 309 धावांनी विजय मिळवला. 


​ ​

संबंधित बातम्या