बात है बोल्ट और बॉटल की

मुकुंद पोतदार
Friday, 14 September 2018

शँपेन म्हणजे दारू नाही तसेच...
आता जाणून घेऊयात या शर्यतीमागील कथा. GH Mumm या फ्रेंच शँपेन उत्पादक कंपनीने अवकाश पर्यटकांसाठी खास शँपेन बनविली आहे. त्याचे लाँचिंग करण्यासाठी ही भन्नाट आयडीया लढविण्यात आली. आता शँपेन म्हणजे जशी दारू नसते तसेच ही शर्यत म्हणजे काही ऑलिंपिक शर्यत नाही याचा खुलासा करून मग ही कथा पुढे नेऊयात. विमानाचे नावही Airbus Zero-G असे होते. मम कंपनीसाठी प्रायोजित केलेला हा उपक्रम होता. बोल्टचे प्रतिस्पर्धी होते फ्रेंच अंतराळवीर ज्याँ-फ्रँकॉईस क्लेरवॉय आणि ज्याने अंतराळयानात उघडल्यावर नेहमीसारखी उडेल अशी शँपेनची बॉटल तयार केली तो फ्रेंच डीझायनर ऑक्तेव द गॉल. एअरबसच्या बेसपाशी सरळ ट्रॅकच्या रेषा होत्या. तिघांनी शर्यत सुरु केली. समोरील भागात जाऊन परत फिरायचे आणि मुळ ठिकाणी यायचे असे शर्यतीचे स्वरुप होते. त्यात तरंगत कोलांटउडी घेत बेसवर पडून वळत बोल्टने दुसरा टप्पा वेगाने सुरु केला आणि बाजी मारली. मग छातीवर उजवा हात मारत आणि डावा हात उंचावत त्याने जल्लोष केला. त्याला कॉर्डन स्टेलार नामक शँपेनची बॉटल देण्यात आली. 

जगातील सर्वाधिक वेगवान मानव (Fastest man in the world) असा लौकीक मिळविलेल्या उसेन बोल्ट याने आणखी एक शर्यत जिंकली आहे. ही शर्यत अॅथलेटीक्स ट्रॅकवर नव्हे तर अंतराळात झाली. ती एका विमानात झाली. हे विमान साधेसुधे नव्हते, तर ते होते एअरबस. मुख्य म्हणजे त्यात अंतराळयानात असते तसे शून्य गुरुत्वाकर्षण (Zero-Gravity) लागू होते. बोल्टला मिळालेले बक्षीसही वेगळे होते. त्याला मिळाली एक शँपेनची बॉटल. ही बॉटल आणि त्यातील शँपेन सुद्धा आगळीवेगळी होती.

ही शर्यत पार पडली ती फ्रान्सच्या अवकाशात. दोन टप्यांत पार पडलेल्या शर्यतीत बोल्टने अक्षरशः उडत आणि तरंगत बाजी मारली. त्याने इतर दोन प्रतीस्पर्ध्यांना हरविले. बोल्टने त्याच्या ट्वीटर हँडलवर याचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला. त्यास 24 तास उलटून जाण्याआधीच तुफान प्रतिसाद मिळाला. ही पोस्ट अर्थातच व्हायरल झाली. त्यातून उत्सुकता वाढल्याने बोल्टचे फेसबुक पेज पाहिले. मग आणखी माहिती घेतली तेव्हा एक अफाट कथा उलगडली.

शँपेन म्हणजे दारू नाही तसेच...
आता जाणून घेऊयात या शर्यतीमागील कथा. GH Mumm या फ्रेंच शँपेन उत्पादक कंपनीने अवकाश पर्यटकांसाठी खास शँपेन बनविली आहे. त्याचे लाँचिंग करण्यासाठी ही भन्नाट आयडीया लढविण्यात आली. आता शँपेन म्हणजे जशी दारू नसते तसेच ही शर्यत म्हणजे काही ऑलिंपिक शर्यत नाही याचा खुलासा करून मग ही कथा पुढे नेऊयात. विमानाचे नावही Airbus Zero-G असे होते. मम कंपनीसाठी प्रायोजित केलेला हा उपक्रम होता. बोल्टचे प्रतिस्पर्धी होते फ्रेंच अंतराळवीर ज्याँ-फ्रँकॉईस क्लेरवॉय आणि ज्याने अंतराळयानात उघडल्यावर नेहमीसारखी उडेल अशी शँपेनची बॉटल तयार केली तो फ्रेंच डीझायनर ऑक्तेव द गॉल. एअरबसच्या बेसपाशी सरळ ट्रॅकच्या रेषा होत्या. तिघांनी शर्यत सुरु केली. समोरील भागात जाऊन परत फिरायचे आणि मुळ ठिकाणी यायचे असे शर्यतीचे स्वरुप होते. त्यात तरंगत कोलांटउडी घेत बेसवर पडून वळत बोल्टने दुसरा टप्पा वेगाने सुरु केला आणि बाजी मारली. मग छातीवर उजवा हात मारत आणि डावा हात उंचावत त्याने जल्लोष केला. त्याला कॉर्डन स्टेलार नामक शँपेनची बॉटल देण्यात आली. 

शून्य गुरुत्वाकर्षण कसे...
ही एअरबस वेगाने सलग वाढत्या उंचीवर जात खाली येत होती. 20 सेकंदांच्या अंतराने शून्य गुरुत्वाकर्षण निर्माण केले जात होते. 

2016 मध्येच बोल्टशी करार
GH Mumm कंपनी विविध खेळांची प्रायोजक आहे. 2000 ते 2015 दरम्यान फॉर्म्युला वन रेसिंगचे अधिकृत प्रायोजक हीच कंपनी होती. शर्यतीनंतर विजयमंचावरील फॉर्म्युला वन ड्रायव्हर एकमेकांवर हीच शँपेन उडवित जल्लोष करायचे. आता या कंपनीने फॉर्म्युला इ या इलेक्ट्रीक कार मालिकेचे प्रायोजकत्व स्विकारले आहे. या कंपनीने नोव्हेंबर 2016 मध्येच बोल्टला करारबद्ध केले. तेव्हा CEO (Chief Entertainment Officer) म्हणून बोल्टला घेतल्याचे जाहीर झाले होते. त्याचा एका लाखो डॉलर खर्च होणाऱ्या कँपेनमध्ये सहभाग असेल इतकेच सांगण्यात आले. तेव्हा गुलदस्त्यात राहिलेला तपशील आत्ता कुठे उघड झाला.

शँपेन कुणासाठी...
तर बोल्टने शर्यत जिंकली तरी ऑक्तेव आणि क्लेरवॉय यांना सुद्धा तशीच हाच पुरस्कार देण्यात आला. आता प्रश्न पडतो तो अंतराळात शँपेन बॉटल उघडते का आणि त्यातून शँपेन पिता येते का यासाठी इतका खर्च का...तर ही शँपेन अंतराळवीरांसाठी नव्हे तर अंतराळ पर्यटकांसाठी आहे. कथेचा तो भाग जाणून घेण्याआधी शँपेन बॉटलविषयी...

चला भेटूयात बॉटल डीझायनरला
जमिनीवर असतानाच शँपेन बॉटल फोडणे ही एक कला असते आणि पिण्याच्या बाबतील (...म्हणजे एकदा बाटली उघडल्यानंतर) कलंदर असलेल्या अनेकांना ती जमतेच असे नाही. अवकाशात शून्य गुरुत्वाकर्षण लागू असताना शँपेन बॉटल उघडल्यावर शँपेन उडायला हवी म्हणून स्पेशल बॉटल तयार करावी लागणार होती. तर हे काम मम ग्रुपने ऑक्तेवकडे सोपविले.

आहे तरी कशी ही शँपेन बॉटल
ही बॉटल ट्वीन चेंबर्ड म्हणजे दोन भाग असलेली आहे. वरील भागात शँपेन आहे. बॉटलवर अॅल्युमिनीयमची रिंग आहे. खालील भागात व्हॉल्व बसविण्यात आला आहे. तो बोटाने फिरविता येतो. त्यानुसार शँपेन बाहेर येते. अंडी ठेवतात तशा कपच्या आकाराच्या ग्लासमधून शँपेन घेता येते.

स्ट्रॉने पिण्याच्या पर्यायापेक्षा भारदस्त
ही कथा ऐकल्यावर एक प्रश्न पडेल की अवकाशात `घेण्या`चा दुसरा कुठला पर्याय नाही का, तर स्ट्रॉ वापरून ड्रींक घेता येऊ शकते, पण लाखो डॉलर खर्च करणाऱ्यांसाठी भारदस्त पद्धत शोधून काढण्यासाठी ही शक्कल लढविण्यात आली आहे.

अवकाशयात्रींच्या मार्केटमध्ये चुरस
आता वेळ आली आहे ती अवकाशात सामान्य नागरीकांना (म्हणजे अंतराळवीर नसलेल्यांना...) पाठविण्यासाठी जगातील काही अग्रगण्य उद्योगपती प्रयत्नशील आहेत. किंबहुना हे मार्केट मिळावे म्हणून चुरस निर्माण झाली आहे. यात अमेरिकी उद्योजक आणि अॅमेझॉनचे बॉस जेफ बेझोस यांचा समावेश आहे. त्यांनी ब्ल्यू ओरीजीन स्पेस कॅप्सुल तयार केली आहे. याशिवाय इंग्लंडच्या रिचर्ड ब्रॅन्सन यांचे व्हर्जिन गॅलॅक्टीकही सुसज्ज होत आहे. (मुंबई-पुणे हायपरलूपची निर्मिती ब्रॅन्सन यांचीच कंपनी करीत आहे. या शर्यतीमधील तिसरा स्पर्धक आहे टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क. त्यांनी स्पेस एक्सची निर्मिती सुरु केली आहे.

बेझॉस यांचे न्यू ग्लेन नामक रॉकेट 2020 मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. मस्क यांनी फाल्कन हेवी हे रॉकेट अंतराळात पाठविले आहे. यंदा फेब्रुवारीत स्पेस एक्स मंगळाच्या कक्षेत पाठविण्यात आले. ब्रॅन्सन यांनी युनिटी स्पेसप्लेनचे टेस्ट फ्लाईट यशस्वी केले आहे. 

अहो, पण ग्राहक आहेत का...
ही कथा ऐकताना आता प्रश्न निर्माण होईल की अंतराळात जाण्यासाठी ग्राहक आहेत का, तर याचे उत्तर होय असे आहे. व्हर्जिनच्या अंतराळवाऱ्यांसाठी तब्बल 700 हून जास्त मातब्बरांनी आपले सीट रिझर्व केले आहे. यात हॉलीवूड अभिनेता ब्रॅड पीट आणि अमेरिकी सिंगर केटी पेरी यांचा समावेश आहे. या मंडळींनी अडीच लाख डॉलरचे सीट बुक केले आहे.

अवकाशात घ्यावी का...
तर आता एक मुलभूत प्रश्न निर्माण होतो की जमिनीवर असतानाच अनेक जण घेतल्यावर हवेत जातात. मग अंतराळात गेल्यावर घेणाऱ्यांचे काय होते...तर याचेही उत्तर आहे. अवकाशात अल्कोहोलचे सेवन करणे योग्य ठरते का यावर संशोधन झाले आहे. 1985 मध्ये युएस फेडरल एव्हीएशन अॅडमिनिस्ट्रेशनतर्फे प्रयोगाद्वारे अभ्यास करण्यात आला. त्यासाठी अतीउंचीवरील वातावरण असलेले चेंबर तयार करण्यात आले. 12 हजार 500 फुट (3.7 किलोमीटर) उंचीवर असते तसे वातावरण या चेंबरमध्ये होते.

घ्या आणि मेंटल मॅथ्स सोडवा...
प्रयोगासाठी 17 पुरुषांची निवड झाली. त्यांना जमिनीवर असताना व्होडका देण्यात आला. मग या चेंबरमध्ये हे 17 जण बसले. दोन्ही बैठका पार पडल्यानंतरच खरे काम होते. त्यांना मेंटल मॅथ्सची काही उदाहरणे देण्यात आली. याशिवाय प्रयोगशाळेत असते त्या ऑस्सीलोस्कोपवरील लाईट जॉयस्टीकने ट्रॅक करण्याची टेस्ट झाली. इतरही काही प्रकारच्या चाचण्या घेण्यात आल्या. 

इतका कुटाणा करून नेमके काय निष्कर्ष निघाला अशी उत्सुकता वाटणे अटळ आहे. तर संशोधकांना जमिनीवर असताना आणि अवकाशात (म्हणजे हवेत...) अशा दोन्ही ठिकाणी घेण्याने कामगिरीत लक्षणीय फरक आढळून आला नाही.

अर्थात 17 जणांच्या गटाला खतरा निर्माण होईल इतपत व्होडका प्राशन करू देण्यात आले नसणार हे उघड आहे. आता One for the road मारण्यापूर्वी इतकेच सांगावेसे वाटते की, तुम्ही जमिनीवर बसा किंवा अवकाशात, तुमच्या विमानाचे सेफ लँडींग व्हायला हवे, क्रॅशलँडींग होणार नाही इतकी दक्षता घ्या.

संबंधित बातम्या