सिंधूला सलाम कि लगाम ? विचार करा अकाऊंट तुमचेच आहे..!

मुकुंद पोतदार
Tuesday, 28 August 2018

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तई त्झू यिंग हिच्याकडून सिंधू पराभूत झाली. सिंधूला फायनलमध्ये फिनीश लाईन पार करण्यात अपयश आले ही वस्तुस्थिती आहे, पण म्हणून ती कटूच आहे असे नाही.

भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू इंडोनेशियातील आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम सामन्यात हरली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या तई त्झू यिंग हिच्याकडून सिंधू पराभूत झाली. सिंधूला फायनलमध्ये फिनीश लाईन पार करण्यात अपयश आले ही वस्तुस्थिती आहे, पण म्हणून ती कटूच आहे असे नाही. जागतिक स्पर्धेत आणि त्याआधी रिओ ऑलिंपिकमध्ये सिंधू स्पेनची कट्टर प्रतिस्पर्धी कॅरोलीन मरीन हिच्याकडून हरली. सिंधूचे सुवर्णपदक दोन्ही वेळा हुकले, पण त्यातही अलिकडेच चीनमधील नानजिंगला पार पडलेल्या जागतिक स्पर्धेतील तिचा पराभव प्रामुख्याने सोशल मिडीयावर बहुसंख्य जणांना, मिडीयातील अनेकांना आणि असंख्य शेरेबाजांना आयते निमित्त ठरला. सिंधूची दोन्ही स्पर्धांतील कामगिरी ऐतिहासिकच होती. याचे कारण या स्पर्धा अंतिम फेरी गाठलेली ती पहिलीच भारतीय ठरली होती. सिंधूने पदार्पणाच्या ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक मिळविले आणि ही कामगिरी नक्कीच तोकडी नाही. जागतिक स्पर्धांतही सिंधूने दोन ब्राँझनंतर दोन रौप्य मिळविली. पदकाचा रंग बदलण्यासाठी म्हणजे सुवर्णपदक जिंकण्यासाठी कसून प्रयत्न करीत असल्याची ग्वाही सिंधूने दरवेळी दिली आहे. नानजिंगमधील स्पर्धेनंतर मात्र सिंधूला अपशकून (jinx), कच खाल्ली (choked) अशा मथळ्यांना सामोरे जावे लागले. त्यानंतर मायदेशी परतलेल्या सिंधूने माझे रौप्यपदक चकाकते आहे, असे ठामपणे सांगितले होते.

पाच ऑगस्ट रोजी सिंधूने जागतिक फेरीत अंतिम फेरी गाठली आणि मग 23 दिवसांत आशियाई क्रीडा स्पर्धेत पुन्हा अंतिम फेरी गाठली. बॅडमिंटनसारख्या तंदुरुस्ती, दमसास, एकूणच शारिरीक क्षमतेचा कस पाहणाऱ्या खेळात इतके सातत्य राखणे सोप्पे अजिबात नाही. पूर्वी फक्त आणि फक्त चीनच्या खेळाडूंना हे जमायचे. उपांत्यपूर्व फेरीपासून चिनी प्रतिस्पर्धी उभे ठाकायचे आणि मग किमान अंतिम फेरीत तरी समोरचा प्रतिस्पर्धी शरण आल्याशिवाय राहायचा नाही. अशावेळी उपांत्यपूर्व फेरीत दोन भारतीयांनी प्रवेश करणे ही कामगिरी कौतुकास्पद मानायला हवी, पण अलिकडे सोशल मिडीयामुळे खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ही वृत्ती आपल्या क्रीडापटूंनाही लागू करायची आणि ते हरताच ताशेरे ओढायचे असा एक उपक्रम-उद्योग सुरु झाला आहे.

सोशल मिडीयाच्याच संदर्भाने पाच ऑगस्ट आणि 28 ऑगस्टच्या दरम्यान एक विलक्षण घटना घडली. ऑलिंपिक चॅनेलने आपल्या ऑफिशीयल ट्वीटर अकाऊंटवर 25 ऑगस्ट रोजी व्हिडीओ संदेश पोस्ट केला आहे. त्यात सिंधूला कॅरोलीनाने शुभेच्छा दिल्या आहेत. शेरेबाजांना यापासून काय बोध घेता येईल याची चर्चा करण्याआधी हा व्हीडिओ काय आहे ते आधी पाहूयात.

व्हिडीओमध्ये सुरवातीला कोर्टवर खाली पडलेली सिंधू दाखविण्यात आली आहे. हा क्षण रिओ ऑलिंपिकमधील अंतिम लढतीचा आहे. मग कॅरोलीनाचा स्पॅनीश भाषेतील संवाद सुरु होता. त्याचवेळी इंग्रजीतील सबटायटल्स अवतरतात.

कोर्टवर पडलेल्या सिंधूला व्हिडीओच्या प्रारंभीच कॅरोलीना भावपूर्ण साद घालते. ऐकतेयस का सिंधू, असे विचारत ती – हाय – करते आणि म्हणते की, तुझ्या उर्वरीत कारकिर्दीसाठी मी शुभेच्छा देऊ इच्छिते. तू ज्या पारितोषिकास सर्वार्थाने पात्र आहेस ते तुला लवकरच मिळेल याची मला खात्री आहे. हे पारितोषिक म्हणजे जागतिक स्पर्धा किंवा ऑलिंपिकमधील सुवर्णपदक होय. त्यासाठी तुला उदंड उर्जा लाभो हीच माझी सदिच्छा आहे. माझा सारा पाठिंबा तुला आहे.

या व्हिडीओमध्ये कॅरोलीनाने सिंधूशी निर्माण झालेल्या मैत्रीचे नातेही प्रकट केले आहे. ती म्हणते की, सिंधू आणि मी कोर्टबाहेर चांगल्या मैत्रिणी आहोत. कोर्टवर पाऊल टाकू तेव्हा आम्ही नेहमीच प्रतिस्पर्धी राहू, याचे कारण शेवटी हा खेळ चुरशीचा आहे. त्यात एकमेकांविरुद्ध खेळावे लागते, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर रिओ ऑलिंपिकनंतर आमच्यात ऋणानुबंध निर्माण झाला. ऑलिंपिक फायनल फार भावनात्मक ठरली. त्यामुळे लाखो क्रीडाशौकीन हेलावून गेले. त्यानंतर आम्ही ज्या स्पर्धांमध्ये भेटलो तेव्हा एकमेकींना अलिंगन दिले. आम्ही एकमेकिंची विचारपूस केली. कसं काय चाललय हे जाणून घेतले.

खरे तर बॅडमिंटनच्या संदर्भात कॅरोलीना ही सिंधूची प्रमुख प्रतिस्पर्धी ठरते. तिचा कोर्टवर सामना करताना सिंधू सर्वस्व पणास लावते आणि मग प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही हरते तेव्हा शेरेबाजांच्या ताशेरेरुपी स्मॅशसमोर मात्र ती निरुत्तर होते. सिंधू सुवर्णपदकास पात्र आहे की नाही याचे उत्तर कॅरोलीनाच्या मते जर होकारार्थी असेल तर मग पुढे आणखी काहीही भाष्य करण्याचा अधिकार पृथ्वीतलावरील कुणालाही उरत नाही. याचे कारण शत्रू जेव्हा शाबासकी देतो तेव्हा तेच खरे सर्टीफिकेट असते असे आजवरच्या मानवजातीचा इतिहास सांगतो.

आपल्याकडील शेरेबाजांना मात्र ते कसे मान्य होणार, झाले तर मग आपले मत कसे मांडणार...तर त्यामुळे असे शेरेबाज सिंधूसारख्या माईलस्टोन कामगिरी करणाऱ्यांना डिवचत राहतात. तसे पाहिले तर केवळ काहीही स्थान नसलेली अशी स्वयंघोषित तज्ञमंडळीच हा उद्योग करतात असे नाही, तर सेलिब्रीटींमधील काही जणही टपून बसलेले असतात. यात फॅशनेबल स्तंभलेखिका शोभा डे आघाडीवर असतात.

वाभाडे स्पेशालीस्ट शोभा डे

अलिकडे नॉनक्रिकेट खेळांमधील भारतीय न्यूजमेकर बनले आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीतरी (किंवा काहिही...) कॉमेंट करून प्रसिद्धी लाटण्याचे उद्योग काही सेलीब्रीटी करीत असतात. या रांगेत शोभा डे आघाडीवर असतात. आयजीच्या जीवावर बायजी उदार ही उक्ती त्यांना चपखल लागू पडते. पण त्यामुळे अनेकदा तोंडघशी पडण्याची नामुष्की या मंडळींवर येते. शोभा डे यांनी राज आणि उद्धव ठाकरे या बंधूंबद्दल अशीच टिप्पणी केली तेव्हा त्यांचे वाभाडे निघाले होते. तर याच शोभा डे यांनी ऑगस्ट 2016 मध्ये सिंधूबद्दल नकारात्मक ट्वीट केले. त्यानंतर त्यांच्यावर सारवासावर करण्याची वेळ आली. तेव्हा सिंधूने रिओ ऑलिंपिकची अंतिम फेरी गाठताना जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला हरविले होते. तेव्हा जागतिक क्रमवारीत सिंधू दहाव्या, तर ओकुहारा सहाव्या क्रमांकावर होती. यानंतरही सिंधूने 21-19, 21-10 असा विजय संपादन केला होता. तिचे किमान रौप्य नक्की झाले होते. तोपर्यंत अंतिम सामना झालेला नव्हता. सिंधू-कॅरोलिना अशीच लढत रंगणार होती. रिओमध्ये भारताचे अनेक पदकविजेते अपयशी ठरल्यामुळे क्रीडाप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण होते. त्यातच शोभा डे यांनी ट्वीट केले की,

"PV SINDHU Silver Princess ?,"

याचे शब्दशः भाषांतर केल्या चंदेरी किंवा रुपेरी राजकन्या असे वरकरणी लै भारी वाटू शकते, पण शोभा डे यांना तसे अपेक्षित नव्हते. सिंधू पुन्हा एकदा फायनलमध्ये हरणार आणि रौप्य पदकावर समाधान मानणार का, असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर मात्र या डे मॅडम यांची सोशल मिडीयावर शोभा झाली. ट्रोलर्सनी त्यांना धारेवर धरले. अखेरीस सुप्रसिद्ध स्तंभलेखिका म्हणून आपली आणखी शोभा होऊ नये म्हणून या डे मॅडमना एक नव्हे तर दोन ट्वीट कराव्या लागल्या.

यातील पहिले ट्वीट असे –

"Silver minted by Sindhu. Chandi ke baad Sona!!!"

आणि दुसरे ट्वीट होते –

"Go for gold, girl!!!"

पहिल्या ट्वीटद्वारे डे मॅडमनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दुसरे ट्वीट मात्र तीन उद्गारवाचक चिन्हांनी पोस्ट केले. याशिवाय तिसऱ्या ट्वीटमध्ये त्यांनी सिंधूला प्रोत्साहित करीत असल्याचा आव आणला.

तोंडातून सुटलेला शब्द जसा परत घेता येत नाही, तसेच सोशल मिडीयावर एकदा पोस्ट झालेली पोस्ट (टपाल खात्याप्रमाणे) परत येत नाही. शोभा डे यांनी त्याआधी सुद्धा रिओ जाओ, सेल्फीज लो, खाली हात वापस आओ असे ट्वीट करताना ऑलिंपिकमधील भारतीयांचा सहभाग म्हणजे पैसा आणि संधीचा अपव्यय असा शेरा मारला होता.

शोभा डे यांना भारताचा पहिला ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा याच्यासह अनेकांनी धारेवर धरले होते. त्यानंतर सिंधू अंतिम फेरीत हरल्यानंतरही बिग बी अमिताभ बच्चन आणि ट्वीटरवरही क्रॉसबॅटेड टोलेबाजी करणारा नजफगडचा नवाब अर्थात विरेंद्र सेहवाग यांनी डे मॅडम यांची खिल्ली उडविणाऱ्या ट्वीट केल्या.

बिग बी असो, बिंद्रा असो किंवा विरू, या मंडळींनी कारकिर्दीत शिखर जसे पाहिले आहे, तसेच ते एकवेळ रसातळाला सुद्धा गेले आहेत. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, असे अशा मंडळींना ठाऊक असते. त्यामुळेच अपयशाची चिरफाड न करता हुरूप कसा वाढवायचा याचे मोल या मंडळींना ठाऊक आहे.

सिंधूच्या बाबतीत आपण काय करायचे...विचार करा, अकाऊंट तुमचे आहे, पासवर्ड तुम्हीच टाकायचा आहे आणि कॉमेंट पण तुम्हीच करणार आहात...


​ ​

संबंधित बातम्या