सार्थ ठरले किंग ऑफ स्विंग बिरूद

मुकुंद पोतदार
Wednesday, 12 September 2018

मला जिमीबद्दल कमालीचा आदर वाटतो. दिर्घ काळ त्याने अप्रतिम गोलंदाज म्हणून प्रभाव पाडला आहे. 140 हून जास्त कसोटी चांगला खेळ करीत राहणे, अथक धावत अहोरात्र गोलंदाजी करीत राहणे आणि उच्च दर्जाचा खेळ करीत राहणे कौतुकास्पद आहे. होय, माझा विक्रम जिमीने मोडला याचा अभिमान वाटतो.

मला जिमीबद्दल कमालीचा आदर वाटतो. दिर्घ काळ त्याने अप्रतिम गोलंदाज म्हणून प्रभाव पाडला आहे. 140 हून जास्त कसोटी चांगला खेळ करीत राहणे, अथक धावत अहोरात्र गोलंदाजी करीत राहणे आणि उच्च दर्जाचा खेळ करीत राहणे कौतुकास्पद आहे. होय, माझा विक्रम जिमीने मोडला याचा अभिमान वाटतो.

- ग्लेन मॅकग्रा, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज

क्रिकेटमधील आद्य कट्टर शत्रू अशी ओळख असलेले आणि अशेससाठी प्राण पणास लावणारे संघ म्हणून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची ओळख आहे. या दोन संघांतील एखादा खेळाडू प्रतिस्पर्ध्याविषयी असे उद्गार काढणे त्यामुळेच निव्वळ धक्कादायक ठरते. विशेष म्हणजे ज्याने हे कौतूक केले तो मॅक््ग्रा आणि जो सत्कारमुर्ती आहे तो अँडरसन हे दोघे हातात चेंडू नसतानाही प्रतिस्पर्ध्याला भिडण्यात तरबेज आहेत. त्यातच अँडरसनने मॅक््ग्राचा वेगवान गोलंदाज म्हणून सर्वाधिक विकेटचा विक्रमही मोडला.

अँडरसनने 26.84च्या सरासरीने 564 विकेट घेतल्या आहेत, तर मॅक््ग्राने 21.64च्या सरासरीने 563 विकेट मिळविल्या. मॅक््ग्राने अँडरसनची मुक्तकंठाने प्रशंसा केली. 2005 मध्ये मॅक््ग्राने वेस्ट इंडिजचे महान गोलंदाज कोर्टनी वॉल्श यांचा उच्चांक मोडला. तेव्हापासून सुमारे 13 वर्षे त्याच्या नावावर हा विक्रम होता. इतका प्रदिर्घ काळ तो राहू शकला याचाही मॅक््ग्राला अभिमान वाटतो.

600 विकेटसाठी शुभेच्छा

अँडरसनने पुढे जाऊन सहाशे विकेट घ्याव्यात अशी इच्छा व्यक्ती करीत मॅक्ग्राने शुभेच्छा सुद्धा दिल्या आहेत. अँडरसन 36 वर्षांचा आहे. तो तंदुरुस्त असून या विक्रमाच्या पार्श्वभूमीवर त्याने निवृत्तीचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. त्यामुळे तो हा टप्पा नक्कीच पार करू शकेल. 

सर्वाधिक विकेटच्या क्रमवारीत यानंतर भारताचा अनिल कुंबळे (619), ऑस्ट्रेलियाचा शेन वॉरन (708) आणि श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (800) हे तिन्ही फिरकी गोलंदाज आहेत.

स्विंगचा संदर्भ

अँडरसनची ओळख स्विंग गोलंदाज अशी आहे. त्याबद्दल तो किंग ऑफ स्विंग या टोपणनावाने लोकप्रिय आहे. मॅक््ग्राने या संदर्भातही भाष्य केले आहे. तो म्हणतो की, स्विंग गोलंदाजीच्या कलेचा मुद्दा निघतो तेव्हा माझ्या मनात वसिम अक्रम याचे नाव येते. अक्रम चेंडू दोन्ही प्रकारे स्विंग करू शकायचा. तो डावखुरा होता. जिमी वेगळा आहे. तो उंच आहे, तो उजव्या हाताने मारा करतो. तो दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकतो. त्याच्यासारखे कौशल्य असलेले गोलंदाज नेहमीच बघायला मिळत नाहीत.

दुखपती हा खेळाचा अविभाज्य भाग असतात. त्यातही वेगवान गोलंदाजांना त्या जास्त होतात. अँडरसनने पाठ आणि खांद्याच्या दुखापतींचा निर्धाराने सामना करीत कारकिर्द घडविली. 

लॉर्डसचा शतकवीर

त्याने 2003 मध्ये झिंबाब्वेविरुद्ध लॉर्डसवर पदार्पण केले. 2018 मध्ये त्याने या ऐतिहासिक मैदानावर विकेटचे शतक पूर्ण केले. एकाच मैदानावर अशी कामगिरी केलेला तो पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला. अँडरसनला उपजत गुणवत्तेमुळे लवकर ब्रेक मिळाला. 2003 मध्ये कौंटी पदार्पणापूर्वीच त्याची वन-डे संघात निवड झाली.  तेव्हा तो अ दर्जाचे फक्त पाच सामने खेळला होता व त्याला नऊ विकेट मिळाल्या होत्या. कसोटी पदार्पणात त्याने झिंबाब्वेविरुद्ध पाच विकेट घेतल्या. अँडरसनने इयन बोथम यांचा 383 विकेट््सचा उच्चांक मोडला. चारशे, तसेच पाचशे विकेट घेतलेला तो इंग्लंडचा पहिलाच गोलंदाज ठरला. कसोटीप्रमणेच वन-डेमध्येही इंग्लंडकडून सर्वाधिक विकेट््सचा उच्चांक त्याच्या नावावर आहे. त्याने तीन वेळा अॅशेस विजेत्या संघाच्या यशात बहुमोल योगदान दिले.  वन-डे क्रिकेटमध्ये हॅट््ट्रिक नोंदविलेला इंग्लंडचा पहिला गोलंदाज. 2003 मध्ये पाकिस्तानविरुद्ध ओव्हलवर ही कामगिरी केली.

मैदानावर तसाही भिडतो...

अँडरसन आक्रमक क्रिकेटपटू आहे. ऑस्ट्रेलियाचा मिचेल जॉन्सन, भारताचे विराट कोहली, रविंद्र जडेजा यांच्याशी झालेल्या त्याच्या चकमकी वादग्रस्त ठरल्या.

फॅशनेबल

फॅशनमधील इंटरेस्ट आणि सौदर्यसंपन्न व्यक्तीमत्त्वामुळे इंग्लंडचा फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅम याच्याशी अँडरसनची तुलना केली जाते.

डोकेबाज अन् परखड

अँडरसन हा एक डोकेबाज गोलंदाज आहे. त्याने प्रदर्शनी सामन्यात डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी केली आहे.  फलंदाजांना अचानक स्वीच-हिट मारणे नियमात बसते, पण गोलंदाजांना तसे करता येत नाही याचा अनेक वेळा जाहीर निषेध करणाऱ्या अँडरसनने किंग ऑफ स्विंग हे बिरूद सार्थ ठरविले आहे. त्याबद्दल त्याला एका कांगारू क्रिकेटपटूने सर्टीफिकेट दिले आहे. एका इंग्लिश क्रिकेटपटूला यापेक्षा आणखी काय हवे 

संबंधित बातम्या