अनमोल आफ्रिकी फुटबॉलरत्नाच्या जर्सीला अनोखा अलविदा

मुकुंद पोतदार
Thursday, 13 September 2018

सुपुत्रही मैदानावर
विया यांचा मुलगा टिमोथी 18 वर्षांचा असून तो पीएसजी कडून खेळतो. मंगळवारी तो सुद्धा मैदानावर उतरला. तो अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करतो. मेक्सिकोविरुद्ध मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय लढतीत तो खेळला. नॅशव्हीलमध्ये हा सामना झाला.

पश्चिम आफ्रिकेतील लायबेरीया नामक देशाच्या मॉन्रोव्हीया नामक राजधानीत मंगळवारी (11 सप्टेंबर) उजाडलेला दिवस साधा ठरला नाही. नायजेरिया आणि लायबेरिया यांच्यात मित्रत्वाचा आंतरराष्ट्रीय सामना झाला. यात लायबेरियाची एक काळ गाजविलेले फुटबॉलपटू आणि विद्यमान अध्यक्ष जॉर्ज विया सहभागी झाले. जानेवारीतच त्यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारली. वयाच्या 51व्या वर्षी ते फुटबॉल मैदानावर उतरले होते. 16 वर्षांच्या ब्रेकनंतर त्यांनी पुनरागमन केले. त्यांच्या प्रसिद्ध अशा 14 नंबरच्या जर्सीला निरोप देण्यासाठी या लढतीचे आयोजन झाले. विया 79 मिनिटे खेळले. लायबेरियाने हा सामना 1-2 असा गमावला, पण या निकालापेक्षा लढतीचे संदर्भ वेगळे होते.

जगात आणि युरोपातही भारी
विया यांनी 1995 मध्ये जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू तसेच बॅलन डी ओर हे पुरस्कार पटकावला. हा मान मिळविलेले ते पहिलेवहिले आफ्रिकी फुटबॉलपटू ठरले. फ्रान्समधील मोनॅको, पॅरीस सेंट जर्मेन, मार्सेली, इटलीमधील एसी मिलान, इंग्लंडमधील चेल्सी, मँचेस्टर सिटी अशा युरोपमधील विविध क्लबकडून ते खेळले. 

थँक्यू किंग जॉर्ज
लायबेरीयाच्या खेळाडूंनी विया यांना मानवंदना देण्यासाठी जय्यत तयारी केली होती. यात त्यांचे 48 वर्षांचे माजी सहकारी जेम्स डेब्बाह यांचाही समावेश होता. सर्व खेळाडूंनी Thank you King George असे शब्द असलेली जर्सी घातली होती. विया यांच्या नेतृत्वाखाली लायबेरीयाचा संघ मैदानात उतरला. त्यांना गोल करता आला नाही, पण चेंडूवर ताबा मिळविताना त्यांनी कारकिर्द भरात असतानाच्या कौशल्याची झलक दाखविली. 11 मिनिटे बाकी असताना त्यांच्याऐवजी बदली खेळाडू उतरविण्यात आला. विया मैदानावरून परत जात असताना प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांचा गजर करीत मानवंदना दिली. गेल्या वर्षी विया यांनी सार्वत्रिक निवडणूकीत दणदणीत विजय मिळविला. त्यामुळे नव्हे तर फुटबॉल कौशल्यामुळे त्यांना हा मान मिळाला.

दृष्टिक्षेपात कारकिर्द
विया यांचा जन्म एक ऑक्टोबर 1996 रोजी मॉन्रोव्हीयामध्ये झाला. वडीलांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांना आजीने लहानाचे मोठे केले. ते क्रू या वंशाचे आहेत. नैऋत्य लायबेरीयातील ग्रँड क्रू कौंटी या अत्यंत गरिबी असलेल्या प्रांतात त्यांचे बालपण गेले. वयाच्या 15व्या वर्षी त्यांनी फुटबॉलच्या छंदावर लक्ष केंद्रीत केले. यंग सर्व्हायव्हर्स युथ क्लबकडून ते खेळले. मग मायची बॅरोल, इन्व्हिन्सीबल इलेव्हन अशा संघांकडून ते खेळले. यातील इन्व्हिन्सीबल इलेव्हनकडून त्यांनी 24 सामन्यांत 23 गोल केले. त्यावेळी कॅमेरूनच्या एका स्काऊटने त्यांना हेरले आणि याऊंड एफसीसाठी करारबद्ध केले. कॅमेरूनचा स्काऊट क्लॉड ली रॉ यांनी मोनॅकोचे मॅनेजर आर्सेन वेंजर यांना वियाच्या क्षमतेविषयी कळविले. त्यानंतर वेंजर स्वतः विया यांचा खेळ पाहण्यासाठी आफ्रिकेला आले. त्यांचे ट्रीप वाया गेली नाही, कारण त्यांना मोनॅको क्लबसाठी हिरा गवसला. तेव्हा लायबेरीयन टेलीकम्यूनिकेशन्स कॉर्पोरेशनमध्ये स्वीचबोर्ड टेक्नीशीन म्हणून काम करणाऱ्या विया यांच्या कारकिर्दीला मग कलाटणी मिळाली. मोनॅकोकडून त्यांनी 1988 ते 1992 दरम्यान 103 सामन्यांत 47 गोल केले. मग पॅरीस सेंट जर्मेन संघाने त्यांना करारबद्ध केले. 1995 पर्यंत 96 सामन्यांत 32 गोल अशी कामगिरी त्यांनी केली. 1995 ते 2000 दरम्यान एसी मिलानकडून 114 सामन्यांत 46 गोलांची कामगिरी नोंदंवित त्यांनी लौकीक उंचावला. त्यानंतर ते चेल्सी व मँचेस्टर सिटीकडून प्रिमीयर लिगमध्ये काही काळ खेळले.

वर्ल्ड कपचे मिशन थोडक्यात हुकले
लायबेरियासारख्या छोट्या देशाला विश्वकरंडकास पात्र ठरवून देण्याच्या मिशनमध्ये मात्र त्यांना थोडक्यात अपयश आले. 2002च्या स्पर्धेसाठी लायबेरियाची पात्रता एकाच गुणाने हुकली. आफ्रिकन कप ऑफ नेशन्स या स्पर्धेला मात्र लायबेरीया 1996व 2002 अशा दोन वेळा पात्र ठरला. वर्ल्ड कप न खेळू शकलेले महन खेळाडू असा त्यांचा उल्लेख अनेक तज्ञ करतात.

राजकारणात उडी
लायेरीयातील यादवी आणि अस्थिर राजकीय परिस्थितीला समर्थ पर्याय देण्यासाठी विया यांनी राजकारणात उडी घेतली. काँग्रेस फॉर डेमोक्रॅटीक चेंज (सीडीसी) पक्षातर्फे त्यांनी 2005 मध्ये अध्यक्षपदाची निवडणूक लढविली, पण युनायटेड पार्टीच्या एलेन जॉन्सन सरलिफ यांच्याकडून ते हरले. 2011 मध्ये ते उपाध्यक्षपदासाठी लढले, पण सरलीफ यांचे सरकार कायम राहिले. विया हे शिकलेले नसल्यामुळे त्यांच्या प्रसार मोहीमेत हा मुद्दा अडथळा ठरला. वास्तविक लंडनमधील पार्कवूड विद्यापीठातून स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये बीए पदवी संपादन केल्याचे विया नमूद करतात, पण यात पारंपरिक पद्धतीचा अभ्यास नसल्याचा युक्तीवाद झाला. अखेर मायामीदील डीव्राय विद्यापीठातून विया यांनी बीझनेस अॅडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली. 2016 मध्ये ते नव्या आशेने आणि जिद्दीने निडणूक रिंगणात उतरले. जोसेफ बोआकाई यांना हरवून त्यांनी निवडणूक जिंकली. 

सुपुत्रही मैदानावर
विया यांचा मुलगा टिमोथी 18 वर्षांचा असून तो पीएसजी कडून खेळतो. मंगळवारी तो सुद्धा मैदानावर उतरला. तो अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करतो. मेक्सिकोविरुद्ध मित्रत्वाच्या आंतरराष्ट्रीय लढतीत तो खेळला. नॅशव्हीलमध्ये हा सामना झाला.

संबंधित बातम्या