IPL 2019 : पृथ्वी शॉ : शत प्रतिशत शोमन

मुकुंद पोतदार
Sunday, 31 March 2019

आयपीएल 2019 : तेंडुलकरप्रमाणे मुंबईकर असणारा, त्याच्याइतकीच गुणवत्ता असणारा, त्याच्यासारखीच क्षमता असणारा, त्याच्याप्रमाणेच क्षमतेचे कामगिरीत रुपांतर करणारा, मास्टर-ब्लास्टरच्या दसनंबरी जर्सीच्या तुलनेत एक शून्य वाढवित शंभर नंबरची जर्सी घालून खेळणारा पृथ्वी शॉ हा शोमन आहे. युवा जगज्जेतेपद मिळविलेला हा कर्णधार कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पणातील शतकवीर आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्सकडून खेळताना केकेआरविरुद्ध त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. निर्धारीत टी-20 सामन्यात तो संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करू शकला नाही.

आयपीएल 2019 : तेंडुलकरप्रमाणे मुंबईकर असणारा, त्याच्याइतकीच गुणवत्ता असणारा, त्याच्यासारखीच क्षमता असणारा, त्याच्याप्रमाणेच क्षमतेचे कामगिरीत रुपांतर करणारा, मास्टर-ब्लास्टरच्या दसनंबरी जर्सीच्या तुलनेत एक शून्य वाढवित शंभर नंबरची जर्सी घालून खेळणारा पृथ्वी शॉ हा शोमन आहे. युवा जगज्जेतेपद मिळविलेला हा कर्णधार कसोटी क्रिकेटमध्येही पदार्पणातील शतकवीर आहे. आयपीएलमध्ये दिल्ली कॅपीटल्सकडून खेळताना केकेआरविरुद्ध त्याचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. निर्धारीत टी-20 सामन्यात तो संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करू शकला नाही. असे असले तरी पृथ्वी शॉ म्हणजे शंभर नंबरी सोने अन् शत-प्रतिशत शोमन आहे यात शंका नाही.

शंभर नंबराशी या शोमनचे आगळे नाते आहे. शंभर म्हणजे हिंदीत सौ. सौ हा शब्द उच्चाराच्या बाबतीत आपल्या आडनावाशी मिळताजुळता असल्याचे त्याला वाटते. त्यामुळे त्याने तीन नंबरी आकड्याची आपल्या जर्सीनंबरसाठी निवड केली. पृथ्वीचे वय लक्षात घेता तो लहान आहे आणि त्यामुळे असा संदर्भ मजेशीर वाटतो.

यंदाच्या आयपीएलपूर्वी पृथ्वीवरून नकारात्मक वृत्त आले होते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बेशीस्तीमुळे त्याची मायदेशी रवानगी करण्यात आल्याची चर्चा होती. त्याचे खंडन पृथ्वीने केले, पण यास त्याने बॅटने प्रत्युत्तर देणे जास्त महत्त्वाचे होते, जे करून दाखविण्यास त्याने 99 धावांच्या खेळीसह सुरवात केली आहे.

मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग, सल्लागार सौरभ गांगुली, सपोर्ट स्टाफमधील महंमद कैफ, मुंबईकर प्रविण आमरे यांच्या सहवासाचा सकारात्मक परिणाम पृथ्वीवर होणे स्वाभाविक आहे. याविषयी पृथ्वी म्हणतो की, माझ्या तंत्रामध्ये बदल करण्याचा प्रयत्न कुणाचाही नसतो. तसे कोणताही प्रशिक्षक करीत नाही. ते केवळ मानसिकतेबद्दल बोलतात. मला त्यातून प्रेरणा मिळते.

सहकारी खेळाडूंकडून शिकण्याची वृत्ती पृथ्वीमध्ये आहे. दिल्ली कॅपीटल्स संघात या प्रक्रियेला चालना मिळते. शिखर धवन याच्याप्रमाणे नैसर्गिक शैलीने खेळत राहण्याची प्रेरणा मिळते. मुंबईकर रोहित शर्मा याच्याकडून इनिंगचे पेसिंग म्हणजे डावाला कसा आकार द्यायचा याचे धडे मिळतात असे तो सांगतो.

आयपीएलमध्ये सुमारे दीड-दोन महिन्यांच्या कालावधीत खेळाडू किमान 14 सामने खेळतात. दिग्गज खेळाडूंसह डग-आऊटमध्ये बसून टी-20चा थरार अनुभवताना त्यांची जडणघडण होऊन प्रतिभेला पैलू पडतात. यंदाची आयपीएल अनेकांसाठी वर्ल्ड कपची रंगीत तालीम आहे. पृथ्वीने अद्याप वन-डे पदार्पण केलेले नाही, पण 99 धावांची इनिंग म्हणजे त्याच्या गुणवत्तेची-क्षमतेची झलक आहे. सलामीवीर म्हणून सक्षम पर्याय अशी ओळख तो निर्माण करतो आहे.

99 धावांवर बाद झाल्यानंतर म्हणजे शतक एका धावेने हुकले म्हणून त्याला अजिबात दुःख झाले नव्हते. तो सीमारेषेच्या पलिकडे तसाच बसून होता. उरलेल्या सामन्यात काय घडते हे तो पाहात होता. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर व्याकुळता आणि आतुरता असे संमिश्र भाव होते. यातून पृथ्वी हा एक टीम-मॅन म्हणजे संघभावना अंगी बाणवलेला क्रिकेटपटू असल्याचे दिसून आले.

ज्यूनीयर ते सिनीयर असे स्थित्यंतर करणे सोपे नसते. त्याच्यानंतर युवा जगज्जेतेपद मिळविलेला दिल्लीकर उन्मुक्त चंद याचे उदाहरण याबाबतीत पुरेसे आहे. मुंबई रणजी संघ, भारतीय संघ, दिल्ली कॅपीटल्स संघ अशा तिन्ही पातळ्यांवर खेळताना त्याचा दृष्टिकोन आणि बांधिलकी परिपक्व असते. अशा इनिंगमुळे पृथ्वी शॉ हा शोमन म्हणून अधिकाधिक चित्तवेधक ठरेल हे नक्की.


​ ​

संबंधित बातम्या