शेवटी काय तर शेपूट हीच शोकांतिका

मुकुंद पोतदार
Monday, 3 September 2018

पूर्वी कसोटी सामने पाच दिवसांतही निकाली ठरत नव्हते. आता मात्र पाच दिवसांची कसोटी अनेकदा तीन, फार तर चार दिवसांत संपते. याचे कारण कसोटी क्रिकेटसारख्या परमोच्च अन् पारंपरिक फॉरमॅटवर इटपट नव्हे तर इन्स्टंट किंबहुना अतीच इन्स्टंट अशा फॉरमॅटचा परिणाम झाला आहे. याच फॉरमॅटमुळे कसोटी क्रिकेटशी संबंधित खेळाडूंची व्याख्या सुद्धा बदलली आहे. 

एखाद्या संघाचे जेव्हा वळवळत राहते शेपूट
तेव्हा व्यर्थ ठरतो प्रतीस्पर्धी संघाचा काथ्याकूट
शेपटाच्या वाढत्या धावांगणिक फटके बसतात बेछूट
शेपटामुळे संबंधित संघाची पकड होत जाते अतूट

कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा परमोच्च, पारंपरिक आणि सर्वाधिक प्रतिष्ठेचा फॉरमॅट आहे. कसोटी क्रिकेट हे आता मात्र पारंपरिक राहिलेले नाही. याचा एकच संदर्भ सांगितला तरी पुरेसा आहे. पूर्वी कसोटी सामने पाच दिवसांतही निकाली ठरत नव्हते. आता मात्र पाच दिवसांची कसोटी अनेकदा तीन, फार तर चार दिवसांत संपते. याचे कारण कसोटी क्रिकेटसारख्या परमोच्च अन् पारंपरिक फॉरमॅटवर इटपट नव्हे तर इन्स्टंट किंबहुना अतीच इन्स्टंट अशा फॉरमॅटचा परिणाम झाला आहे. याच फॉरमॅटमुळे कसोटी क्रिकेटशी संबंधित खेळाडूंची व्याख्या सुद्धा बदलली आहे. 

अष्टपैलू नव्हे युटिलीटी क्रिकेटीयर्स

कसोटी क्रिकेटमध्ये पूर्वी अष्टपैलू होते. त्यांचे batting all-rounder आणि bowling all-rounder असे प्रकार होते. हे अष्टपैलू आपली मुख्य भूमिका चोख बजावायचे आणि दुसऱ्या क्षेत्रात जमेल तसे योगदान द्यायचे. तेव्हाच्या काळातील कसोटी क्रिकेट, तेव्हाची चुरस, संघाचा दर्जा, त्यातील तफावत, मायदेशात किंवा परदेशात कसोटी असणे असे अनेक मुद्दे समीकरणात असायचे. आता मात्र बहुतेक संघ तुल्यबळ झाले आहेत. 

निकालत निर्णायक ठरणारा क्लास

आता मैदानावर प्रमुख फलंदाज विरुद्ध प्रमुख फलंदाज (top order), गोलंदाज विरुद्ध गोलंदाज आणि इतकेच नव्हे तर जे मुलतः गोलंदाज असतात ते तळाचे फलंदाज विरुद्ध तळाचे फलंदाज अशा आघाड्यांवर तोडीस तोडी मुकाबला रंगतो. याचे कारण असे की आता इन्स्टंट फॉरमॅटमुळे utility cricketers - युटिलीटी क्रिकेटीयर्स असा एक नवा क्लास उदयास आला आहे, जो कसोटी क्रिकेटच्या निकालातील परिणामकारक घटक ठरत आहे. भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत याच क्लासची कामगिरी बहुमोल ठरली. इंग्लंडने मालिकेत विजयी आघाडी घेतली असल्यामुळे या संदर्भाने आढावा घेणे उचित ठरते. त्याआधी चौथ्या कसोटीनंतर प्रमुख खेळाडूंच्या याविषयीच्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात.

दोन्ही संघांच्या टॉप ऑर्डरसाठी ही मालिका फार खडतर ठरली. एखाद्या मोसमात होते असे. मध्य आणि तळाच्या फळीमुळे आम्ही जिंकलो, जे आमचे बलस्थान ठरले. याशिवाय आमची गोलंदाजीही उत्तम झाली. अर्थात तुम्ही सतत तळाच्या फळीवर अवलंबून राहता कामा नयेच.
- ज्यो रूट, इंग्लंडचा कर्णधार

सॅम करनविषयी

सॅम करनने तीन कसोटींवर एवढ्या तरुण वयात इतका विलक्षण प्रभाव पाडणे अतुलनीय आहे. हा त्याच्यासाठी आणि आमच्या संघासाठी उत्साहवर्धक काळ आहे.
- ज्यो रूट

मी सॅम करनचे अभिनंदन करू इच्छितो. इंग्लंडसाठी तो छान कामगिरी करतो आहे. मी त्याला शुभेच्छा देतो.
- विराट कोहली, भारतीय कर्णधार

विजयामुळे माझा आनंद ओसंडून वाहतो. तिसऱ्या कसोटीतील भारतीयांच्या खेळामुळे आमच्यावर थोडे दडपण आले होते. कसोटीच्या तिसऱ्या डावातील आमच्या 271 धावा निर्णायक ठरल्या. आम्ही मनातील शंकासूर नष्ट केले. मला माझ्या फलंदाजीचा नवा पैलू गवसला. खेळपट्टीवर तग धरणे अतीशय महत्त्वाची गोष्ट असते.
- बेन स्टोक्स, इंग्लंडचा अष्टपैलू

जे काही घडत आहे त्यावर माझा विश्वासच बसत नाही. मी सारे काही अनुभवण्याचा प्रयत्न करतो आहे. मी नैसर्गिक खेळ करायचा प्रयत्न करतोय, जो मी सरेकडून कौंटीत खेळताना करतो तसाच.
- सॅम करन, इंग्लंडचा अष्टपैलू

आकडेवारीचा आधार

या प्रतिक्रियांच्या अनुषंगाने आता आकडेवारीचा आधार घेऊयात.

इंग्लंडच्या शेपटाचे फलंदाजीतील योगदान

ख्रिस वोक्स : (कसोटी 2, धावा 149, सर्वोच्च नाबाद 137, सरासरी 74.50, स्ट्राईकरेट 80.54, चौकार 24)

सॅम करन : (कसोटी 3, धावा 251, सर्वोच्च 78, सरासरी  50.20, स्ट्राईकरेट 62.12, चौकार 31, षटकार 4)

बेन स्टोक्स : कसोटी 3, धावा 152, सर्वोच्च 62, सरासरी 25.33, स्ट्राईकरेट 34.31, चौकार 15)

विशेष नोंद : इंग्लंडचा तळाचा एकही फलंदाज एकदाही शून्यावर बाद झाला नाही. इतकेच नव्हे तर इंग्लंडच्या एकाही खेळाडूवर एकदाही ही नामुष्की आली नाही.

...आणि भारताचे शेपूट

हार्दिक पंड्या : (कसोटी 4, धावा 164, सर्वोच्च नाबाद 52, सरासरी 23.42, स्ट्राईकरेट 56.94, चौकार 26, षटकार 1, भोपळा 1)

अश्विन : (कसोटी 4, धावा 126, सर्वोच्च नाबाद 33, सरासरी 21.00, स्ट्राईकरेट 71.18, चौकार 19, षटकार 1, भोपळा - )

इशांत शर्मा : (कसोटी 4, धावा 33, सर्वोच्च 14, सरासरी 5.50, स्ट्राईकरेट 41.77, चौकार 4, भोपळे 2)

महंमद शमी : (कसोटी 4, धावा 26, सर्वोच्च नाबाद 10, सरासरी 3.71, स्ट्राईकरेट 72.22, चौकार 3, भोपळे 3)

जसप्रीत बुमरा : (कसोटी 2, धावा 6, सर्वोच्च 6, सरासरी 3.00, स्ट्राईकरेट 18.18, भोपळा 1)

कुलदीप यादव : एका कसोटीत चष्मेबद्दूर (दोन्ही डावांत शून्यावर बाद)

उमेश यादव : (एका कसोटीत नाबाद एक धाव)

इथे निष्कर्षाप्रत येण्यापूर्वी एक खुलासा तातडीने करावा लागेल आणि तो म्हणजे भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडमधील अनुकुल हवामानाचा फायदा उठवित प्रयत्नांची पराकाष्ठा केली. इंग्लंडचा सर्वाधिक अनुभवी सलामीवीर अॅलिस्टर कूक याच्यास टॉप ऑर्डरला त्यांनी स्थिरावू दिले नाही. याबद्दल गोलंदाजांना शाबासकी द्यावीच लागेल, पण ही आकडेवारी पाहता इंग्लंडचे शेपूट आणि त्यातही युटिलीटी क्रिकेटीयर्स हेच टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरले. आपले गोलंदाज प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजांना फलंदाजीत रोखू शकले नाहीत. भारतीय गोलंदाजांचे फलंदाजीतील भोपळे आणि इंग्लंडच्या गोलंदाजांचे फलंदाजीतील योगदान आणि त्यातही स्ट्राईकरेट आणि चौकारांची संख्या सुद्धा विचारात घ्यावी लागेल.

युटिलीटी क्रिकेटीयर्सची एक धाव ही अंतिम समीकरणात दुप्पट मोल मिळविते. खरे तर भारतीय गोलंदाजांनी अगदी इंग्लंडच्या गोलंदाजांसारखी फटकेबाजी केली नसती तरी चालले असते. त्यांनी किमान भोपळे तरी फोडायला हवे होते. खेळपट्टीवर थोडी तग धरायला हवी होती. खास करून ज्या डावांत ते शून्यावर गारद झाले ते पाहता घात होण्याचे कारण हे ठरते.

यातील उमेश यादव, कुलदीप यादव यांना सुट देता येईल. शमी आणि बुमरा यांना धारेवर धरण्याची गरज नाही. इशांतकडे सर्वांत आधी बोट करावे लागेल. कसोटी क्रिकेटमधील त्याचा अनुभव पाहता आणि इतर प्रमुख कसोटी संघांचे गोलंदाज फलंदाजीत देत असलेले योगदान पाहता इशांतने त्यांच्यापासून बोध घ्यायला हवा. त्यातही दोन सप्टेंबर हा इशांतचा जन्मदिवस असतो. त्यामुळे तरी या बर्थडे बॉयला प्रेरणा मिळायला हवी होती.

अश्विनबद्दल गोलंदाज म्हणून परदेशातील कामगिरी चर्चेचा विषय ठरते. त्याने इंग्लंडमध्ये ठसा उमटवला सुद्धा, पण जसे फलंदाजीत केवळ एकट्या विराटला भार पेलावा लागतो, तसे अश्विनच्या बाबतीत गोलंदाजीत करणे योग्य नाही. फलंदाजीत मात्र अश्विनने एक बुद्धिमान आणि धुर्त क्रिकेटपटू म्हणून आणखी थोडा वाटा उचलायला हवा होता.

आता राहता राहिला तो पंड्या. वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज आणि परखड समालोचक मायकेल होल्डिंग यांनी पंड्याच्या अष्टपैलूत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंड्याने एकदा पाच विकेट घेतल्या, ज्या बहुमोल ठरल्या. असे असले तरी संघातील खराखुरा अष्टपैलू म्हणून पंड्याचाच उल्लेख केला जातो. त्याने निराशा केली हे मात्र खरे. शेपूट वळवळते तेव्हा प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकरण होते. भारताचे गोलंदाज मात्र शेपूट म्हणून वळवळू शकले नाहीतच आणि शिवाय इंग्लंडचे शेपूट ठेचूही शकले नाहीत. शेवटी काय तर शेपूट हीच भारतासाठी शोकांतिका ठरली असा एक मतप्रवाह असू शकतो.


​ ​

संबंधित बातम्या