करन घराण्याचा मानबिंदू

मुकुंद पोतदार
Sunday, 5 August 2018

डावखुरा अष्टपैलू
करनचे वैशिष्ट्य म्हणजे तो डावखुरा आहे. तो अष्टपैलू आहे. त्यामुळे संघाच्या रचनेत तो उपयुक्त ठरू शकतो. त्याने आपली उपयुक्तता अपेक्षेहून कितीतरी पटींनी जास्त प्रमाणात सिद्ध केली. सॅमने पहिल्या डावात चार विकेट टिपल्या. मग फलंदाजीत त्याने कमाल केली. दुसऱ्या डावात इंग्लंडची घसरगुंडी उडाली असताना त्याने आठव्या क्रमांकावर 63 धावा फटकावल्या. ज्या डावात सर्वोत्तम ठरल्या.

संघातील ज्यो, जॉनी, बेन, आदींच्यात सर्वांत ज्यूनीयर सॅम
कारकिर्दीतील दुसऱ्याच कसोटीमध्ये खेळला जिद्दीने जाम
दुसऱ्या डावातील फलंदाजीने टिम इंडियाला फोडला घाम
या सामनावीराच्या पराक्रमाने वसूल झाले तिकाटाचे दाम

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटींच्या मालिकेचे पडघम वाजत होते तेव्हा अनेक खेळाडूंची नावे गाजत होती. दोन्ही संघांमध्ये अनेक रथी-महारथी असल्यामुळे ते स्वाभाविकच होते. विराट कोहली विरुद्ध जिमी अँडरसन, अ-लिस्टर कूक विरुद्ध अश्विन असे मुकाबले रंगण्याची अपेक्षा होती. इंग्लंडची मदार असलेल्या आणि कसोटीवर छाप पाडतील अशा मोहऱ्यांमध्ये बेन स्टोक्स, स्टुअर्ट ब्रॉड यांचीही नावे आघाडीवर होती. प्रत्यक्षात निर्णायक योगदान मात्र दिले एका अगदी नवोदीत खेळाडूने. विशेष म्हणजे तो कारकिर्दीतील दुसरीच कसोटी खेळत होता.  जूनच्या प्रारंभीच त्याने पाकिस्तानविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते, तर त्याच महिन्याच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचे वन-डे पदार्पण झाले होते.

डावखुरा अष्टपैलू
करनचे वैशिष्ट्य म्हणजे तो डावखुरा आहे. तो अष्टपैलू आहे. त्यामुळे संघाच्या रचनेत तो उपयुक्त ठरू शकतो. त्याने आपली उपयुक्तता अपेक्षेहून कितीतरी पटींनी जास्त प्रमाणात सिद्ध केली. सॅमने पहिल्या डावात चार विकेट टिपल्या. मग फलंदाजीत त्याने कमाल केली. दुसऱ्या डावात इंग्लंडची घसरगुंडी उडाली असताना त्याने आठव्या क्रमांकावर 63 धावा फटकावल्या. ज्या डावात सर्वोत्तम ठरल्या.

खेळाचा आनंद लुटतो
सॅमची तज्ज्ञांना चकित करणारी आणि प्रेक्षकांना भावलेली गोष्ट म्हणजे तो खेळाचा आनंद लुटतो. इतक्या बहुचर्चित मालिकेत खेळताना भल्याभल्या खेळाडूंवर दडपण येते. हे दडपण लौकीकाचे, अपेक्षेनुसार कामगिरी करून दाखविण्याचे असते. या आघाडीवर इंग्लंडचे कुक, ब्रॉड, तर भारताचे अजिंक्य रहाणे, मुरली विजय, के. एल. राहुल असे अनुभवी खेळाडू भरीव योगदान देऊ शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर मनोधैर्याची सत्वपरिक्षा पाहणाऱ्या या कसोटी क्रिकेटच्या व्यासपीठावर सॅमने दाखविलेली परिपक्वता त्याचा कर्णधार ज्यो रूट यालाही थक्क करणारी ठरली. इतका प्रतिभावान खेळाडू आमच्या संघात असणे फार चांगले आहे. त्याने अजिबात दडपण घेतले नाही, अशी रूटची प्रतिक्रिया पुरेशी आहे.

शिकण्याची वृत्ती
सर्वोच्च पातळीवर प्रत्यक्ष खेळताना निरीक्षणातून खुप काही शिकता येते. निरीक्षण अन् त्यातून परिक्षण करीत खेळाडू प्रगती साध्य करू शकतो. त्यासाठी सुक्ष्मनिरीक्षण शक्ती लागते. ती सॅमकडे असल्याचे त्याच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले. पहिल्या डावात विराटने साकारलेल्या धिरोदात्त खेळातून शिकण्याचा प्रयत्न केला असे त्याने नमूद केले. त्याने आणखी एक उल्लेख केला तो कुमारचा. हा कुमार म्हणजे श्रीलंकेचा कुमार संगकारा.

क्रिकेटचे घराणे
सॅमच्या रक्तातच क्रिकेट आहे. मुख्य म्हणजे मैदानापेक्षा मैदानाबाहेर त्याने संघर्षपूर्ण परिस्थितीचा सामना केला आहे. आज चाळीशी-पन्नाशीत असलेल्यांना केव्हीन करन हे नाव परिचीत आहे. धिप्पाड बांधा आणि काहीसे सोनेरी केस असे त्यांचे रूप भारावून टाकणारे असायचे. झिंबाब्वेकडून ते दोन विश्वकरंडक स्पर्धांत खेळले. 1983च्या इंग्लंडमधील विश्वकरंडकात झिंबाब्वेने मातब्बर ऑस्ट्रेलियाला हरवित सनसनाटी पदार्पण केले. त्या सामन्यात सातव्या क्रमांकावर 27 धावा आणि अॅलन बोर्डरची विकेट असे उपयुक्त योगदान केव्हीनने दिले. 1987 मध्ये भारतात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेतही त्यांचा सहभाग होता. केव्हीनने इंग्लीश कौंटीत ग्लुस्टरशायर आणि नॉर्दम्प्टनशायरकडून भरीव कामगिरी केली. मोसमात एक हजारपेक्षा जास्त धावांचा पराक्रम त्यांनी पाच वेळा केला.

अशा या केव्हीनचे वडील प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. करन घराण्याच्या तिसऱ्या पिढीत टॉम, बेन आणि सॅम असे तिघे प्रतिनिधी आहेत. सर्वांत मोठ्या टॉमने दोन कसोटी, आठ वन-डे आणि सहा टी-20 सामने खेळले आहेत. तो आयपीएलमध्येही सहभागी झाला आहे. मधला भाऊ बेन नॉर्दम्प्टनशायरच्या द्वितीय श्रेणी संघाकडून खेळला आहे. सॅम सर्वांत ज्यूनीयर असून त्याने सर्वांधिक भरारी घेतली.

बालपणीचा काळ सुखाचा
अर्थात त्यासाठी सॅमला कमालीचा संघर्ष करावा लागला. झिंबाब्वेतील रुसापेमध्ये करन बंधूंचे बालपण आनंदात जात होते. याविषयी सॅमने म्हटले आहे की, मी सर्वांत धाकटा असल्यामुळे माझ्या वाट्याला केवळ बोलींग यायची. शेवटची दोन मिनिटे मला बॅटिंग मिळायची. मी पहिलाच बॉल मारल्यानंतर तो शोधण्यात उरलेला वेळ जायचा आणि आमचा खेळ संपायचा. अर्थात हे करताना फार मजा आली.

आक्रित 
दुर्दैवाने हे मजेचे दिवस फार टिकले नाहीत. झिंबाब्वेचे दिर्घकालीन सत्ताधीश रॉबर्ट मुगाबे यांच्या 2004 मधील जमीन सुधारणा विधेयकाअंतर्गत करन कुटुंबियांना फॉर्महाऊस खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली. त्यांच्या शेजाऱ्यांना तीन-चार तासांत घरातून बाहेर काढण्यात आले, पण केव्हीन करन यांनी देशाचे प्रतिनिधीत्व केले असल्यामुळे आणि प्रशिक्षक म्हणूनही त्यांचा लौकीक होता. त्यामुळे महिनाभराची मुदत देण्यात आली. केव्हीन यांच्या आईचे रक्षाविसर्जन येथे झाले होते. त्यामुळे या फार्महाऊसशी करन कुटुंबाचे भावनिक नाते होते, पण महिन्यात त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू जेफ मार्श झिंबाब्वेचे प्रशिक्षक होते. त्यांनी करन यांना हरारेमधील घरात आसरा दिला. झिंबाब्वे क्रिकेट मंडळाने प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केल्यामुळे मार्श यांना ही सदनिका मिळाली होती. मार्श यांचे दोन पुत्र शॉन आणि मिचेल हे सुद्धा क्रिकेटपटू आहेत. यातील मिचेलशी करन बंधूंची मग घट्ट मैत्री झाली.

आकाश कोसळले
दरम्यानच्या काळात केव्हीन करन प्रशिक्षक म्हणून सक्रीय होते. दहा ऑक्टोबर 2012 रोजी सकाळी जॉगिंग करताना ते कोसळले. वयाच्या 53व्या वर्षी ह्रदयविकाराच्या धक्याने त्यांचे आकस्मिक निधन झाले. करन बंधूंची तेव्हाची अवस्था काय झाली असेल याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा येईल. अर्थात घराण्यातील क्रिकेटच्या परंपरेमुळे त्यांना बळ मिळाले.

कौंटीत पराक्रम
टॉम आणि सॅम सरेकडून कौंटी क्रिकेट खेळू लागले. 2015 मध्ये सरेकडून नॉर्दम्प्टनशायरविरुद्ध डावातील सर्व दहा विकेट घेतल्या. अशी कामगिरी केलेले ते पहिलेच बंधू ठरले. टॉमला मोसमातील सर्वोत्तम नवोदीत खेळाडू हा किताब मिळाला.

शेंडेफळ सॅमने तर दुसऱ्याच कसोटीत सामनावीर किताब पटकावत करन घराण्याचा लौकिक उंचावला. या पुरस्कारासाठी अनेक क्रिकेटपटूंना दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळेच सॅमचा पराक्रम थक्क करणारा आहे.


​ ​

संबंधित बातम्या